आंबिवली-मोहने परिसरात कंडक्टर तुटल्याने वीजपुरवठा खंडित; महावितरणाचे युद्धपातळीवर दुरुस्ती काम

टिटवाळा, वार्ताहर : आंबिवली येथील मोहने परिसरात वीजवाहिनीचा कंडक्टर तुटल्याने मांडा पश्चिम भागासह परिसरातील काही भागांचा वीजपुरवठा आज सकाळपासून खंडित झाला आहे. अचानक वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिक, व्यावसायिक तसेच दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून उष्णतेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

घटनेची माहिती मिळताच महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तांत्रिक पथकाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून तुटलेला कंडक्टर दुरुस्त करून वीजवाहिनी सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उंच विद्युत खांबावर चढून कर्मचारी अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत काम करत असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळाले.

वीजपुरवठा खंडित झाल्याने घरगुती वापरासह पाणीपुरवठा, लहान उद्योग, दुकाने आणि इंटरनेट सेवांवरही परिणाम झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. सकाळपासूनच वीज नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, महावितरणाचे अधिकारी घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील 15 ते 30 मिनिटांत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणाकडून करण्यात आले आहे.

महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून सतत प्रयत्न सुरू असून सुरक्षिततेची सर्व आवश्यक काळजी घेत वीजवाहिनी दुरुस्त केली जात आहे. त्यामुळे लवकरच मांडा पश्चिम भागासह प्रभावित परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *