स्वामी विवेकानंद विद्यालयाचा शंभर टक्के निकाल; संस्कृती चव्हाण ९६.४० टक्क्यांनी शाळेत प्रथम

डोंबिवली : “आमच्या शाळेचा अभिमान, गुणवत्तेचा नवा मान, शाळा मराठी माझी शाळा मराठी” या ब्रीदवाक्याला साजेसा निकाल देत स्वामी विवेकानंद विद्यालय, विष्णुनगर (प्राथमिक), डोंबिवली शाळेने यंदा दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या निकालात विद्यार्थिनी कु. संस्कृती निलेश चव्हाण हिने तब्बल ९६.४० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशामुळे शाळा, कुटुंब आणि डोंबिवली परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा जिल्ह्यातील कवठे गावाशी नाळ जुळलेली संस्कृती ही डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर, देवी चौक परिसरात वास्तव्यास आहे. तिचे वडील निलेश चव्हाण हे गेली २५ वर्षे खासगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आपल्या मुलीने शिक्षणात मोठे यश मिळवून देशभर नाव कमवावे, हे त्यांचे स्वप्न होते. संस्कृतीनेही त्या स्वप्नासाठी वर्षभर कठोर मेहनत घेत अखेर दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

निकाल समजताच चव्हाण कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मुलीच्या यशाने आई-वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला. संस्कृतीने सांगितले की, “मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने अभ्यास केला. शाळेतील सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन आम्हाला शिकवले. माझ्या आई-वडिलांनी शिक्षणासाठी कधीच काही कमी पडू दिले नाही. आज मी माझ्या शाळेचे, आई-वडिलांचे आणि नातेवाईकांचे नाव उंचावले याचा मला आनंद आहे.”

यावेळी तिने मुख्याध्यापक रायसिंग सर, पर्यवेक्षक रानडे मॅडम तसेच लक्ष्मण शिंदे सर, महाजन मॅडम, गढरी मॅडम, गवळी सर, सपकाळे सर, शिंपी सर, पोतदार मॅडम, खर्चे मॅडम, देसाई मॅडम, नाईक मॅडम, केळकर मॅडम, देशपांडे मॅडम, मराठे मॅडम आणि रेखा मॅडम यांचे विशेष आभार मानले.

संस्कृतीच्या या यशाबद्दल प्रकट महाराष्ट्रचे संपादक रविंद्र जाधव कोतापकर, डोंबिवली प्रतिनिधी दिनेश हुमणे तसेच शिक्षक लक्ष्मण शिंदे यांनी तिच्या घरी भेट देत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. संस्कृतीच्या यशामुळे डोंबिवलीच्या शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *