टिटवाळा : टिटवाळा पूर्व परिसरात २२ वर्षीय मोहित गोयल या युवकाने घरातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सुमारे सव्वातीनच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गोयल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहित गोयल हा आपल्या आईसोबत टिटवाळा पूर्व भागात वास्तव्यास होता. दुपारच्या सुमारास घरातील सदस्यांना मोहितने घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती समोर येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
या प्रकरणी मोहितची आई गीतागिरी गोयल यांनी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मोहित गोयलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, गोयल कुटुंब हे मूळचे गुजरात येथील रहिवासी असल्याचे समोर येत आहे. परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली असून एवढ्या कमी वयात युवकाने जीवन संपवल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी विविध अंगांनी तपास सुरू आहे.















Leave a Reply