महावितरणची नागरिकांना पूर्वतयारीची सूचना; टिटवाळा परिसरातील अनेक भाग प्रभावित
टिटवाळा : महावितरणकडून 22 केव्ही फळेगाव वीजवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीची महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी अनेक भागांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी 9.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हा वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे.
नियमित आणि सुरक्षित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही तांत्रिक दुरुस्ती आवश्यक असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत परिसरातील घरगुती ग्राहक, दुकाने, व्यावसायिक आस्थापने तसेच इंटरनेट आणि पाणीपुरवठा सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ज्या भागांमध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे त्यामध्ये पद्मावती रॉयल रेसिडेन्सी संकुल, गोवेली रोडचा काही भाग, जावईपाडा, समर्थ नगर, भारामबे फार्महाऊस, शंकरनाथ मठ व परिसर तसेच रुंदा रोड परिसराचा समावेश आहे.
महावितरणने नागरिकांना आवश्यक उपकरणे चार्ज करून ठेवणे, पाण्याचा साठा करणे आणि इतर आवश्यक तयारी करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. काम पूर्ण होताच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.













Leave a Reply