अनधिकृत बांधकाम हटवताना पोलिसांवर हल्ला; टिटवाळ्यात तणाव, तीन महिला आरोपी अटकेत

टिटवाळा : कल्याण डोंबिवली महानगरपालिका च्या अनधिकृत बांधकाम निष्कासन पथकावर कारवाईदरम्यान झालेल्या हल्ल्यामुळे टिटवाळ्यात मोठा तणाव निर्माण झाला. खजुरीनगर, बनेली परिसरात अनधिकृत चाळींवर कारवाई सुरू असताना काही महिलांनी पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गंभीर प्रकार घडला. या प्रकरणी तीन महिला आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २२ मे २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रभाग क्षेत्र १/अ अंतर्गत खजुरीनगर, बनेली, टिटवाळा परिसरात महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम निष्कासन पथकाकडून मोठी कारवाई सुरू होती. पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान काही महिलांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारी कर्मचाऱ्यांना विरोध केला. यावेळी शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांवर धक्काबुक्की आणि हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात आरोपी म्हणून  रुबिना मोहम्मद शफीक खान (वय ४२),  साफिया मोहम्मद शफीक खान (वय २३),  शाहिना मोहम्मद शफीक खान (वय २१), तसेच अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी खजुरीनगर, बनेली, टिटवाळा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

कारवाईदरम्यान महिला सहायक पोलीस निरीक्षक सरला काळे आणि इतर महिला पोलिसांनाही धक्काबुक्कीला हल्ल्याला  सामोरे जावे लागले. यात त्यांना दुखापत देखील झाली आहे . परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आणि आव्हानात्मक बनली होती. मात्र अशा गंभीर परिस्थितीतही सहायक पोलीस निरीक्षक सरला काळे यांनी खंबीर नेतृत्व दाखवत कारवाई यशस्वीपणे पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत परिसरातील तब्बल २८० घरे आणि ५० जोत्यांवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.

या संदर्भात महानगरपालिकेचे अधीक्षक शंकर नारायण जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ग्यानोबा इंदाळे करीत आहेत.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलीस चे अपर पोलीस अधीक्षक तसेच मुरबाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने जलद हालचाली करत महिला आरोपींना २३ मे रोजी अटक केली.

सदर महिला आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे टिटवाळा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई आणि त्यास होणारा विरोध हा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. आता या प्रकरणात पुढे आणखी कोणती कारवाई होते आणि उर्वरित आरोपींना कधी अटक होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *