पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांची मायेची पाणपोई; मार थोमा विद्यापीठाचा पर्यावरण दिनी स्तुत्य उपक्रम

टिटवाळा | प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वत्र वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत असताना टिटवाळा येथील मार थोमा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाला भूतदयाची जोड देत एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला. ‘पक्षी वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेतून इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली पक्षीघरटी आणि पाणपोई शाळेच्या परिसरातील झाडांवर बसवून मुक्या जीवांप्रती संवेदनशीलतेचा संदेश दिला.

सध्या वाढत्या तापमानामुळे आणि तीव्र उष्णतेमुळे पक्ष्यांना अन्न व पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळेच्या इको क्लबतर्फे विद्यार्थ्यांना टाकाऊ साहित्यापासून पक्षीघरटी आणि दाणा-पाण्याची भांडी तयार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी घरातील वापरात नसलेल्या वस्तूंचा कल्पकतेने वापर करून विविध आकारांची आकर्षक घरटी आणि पाण्याची भांडी तयार केली.

मुख्याध्यापिका आरती मॅडम, सुपरवायझर गायत्री मॅडम तसेच पर्यावरण उपक्रम प्रमुख शिक्षक मनीषा मॅडम आणि माधुरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व वर्गशिक्षकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

विद्यार्थ्यांनी तयार केलेली घरटी आणि पाणपोई शाळा परिसरातील मोठ्या झाडांवर सुरक्षितपणे बसवण्यात आली. विशेष म्हणजे काही वेळातच अनेक पक्षी त्या ठिकाणी येऊन दाणा टिपताना आणि पाणी पिताना दिसून आले. पक्ष्यांची ही वर्दळ पाहून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आपल्या हाताने तयार केलेल्या साधनांचा प्रत्यक्ष फायदा पक्ष्यांना होत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांना वेगळे समाधान मिळाले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबरोबरच प्राणी-पक्ष्यांविषयी प्रेम, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने ‘निसर्ग संवर्धन म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे, तर सजीव सृष्टीचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे’ हा संदेश प्रभावीपणे दिला.

मार थोमा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे टिटवाळा परिसरातील नागरिक, पालक आणि पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमधून समाजात पर्यावरणाबाबत सकारात्मक जनजागृती होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *