टिटवाळा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात रविवारी सायंकाळी सादर करण्यात आलेल्या भव्य मराठी म्युझिकल शो ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा गौरवशाली इतिहास, स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष आणि राष्ट्रप्रेरणेची गाथा रंगमंचावर प्रभावीपणे उभी राहताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनासह अभिनेते किरण माने यांच्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. राज्याभिषेकामागील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंचे प्रभावी चित्रण करण्यात आल्याने प्रेक्षक अक्षरशः इतिहासाच्या त्या सुवर्णक्षणांमध्ये रमून गेले.
या भव्य कार्यक्रमाच्या यशामागे टिटवाळ्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते ॲड. जयेश वाणी आणि युवासेना कल्याण शहर सचिव महेश एगडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष योगदान राहिले. दोघेही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे कट्टर अनुयायी असून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांशी निगडित उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असतात. त्यांच्या पुढाकारातून आणि नियोजनातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वराज्यासाठी दिलेले बलिदान, मावळ्यांचे शौर्य आणि हिंदवी स्वराज्याचा अभिमान यांचे जिवंत दर्शन घडले. त्यामुळे उपस्थित युवक-युवतींना इतिहासाची नव्याने ओळख झाली, तर ज्येष्ठ नागरिकांनाही शिवकालीन वैभव पुन्हा अनुभवता आले.
अशा प्रकारचे दर्जेदार ऐतिहासिक कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता नव्या पिढीपर्यंत खरा इतिहास पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी अविस्मरणीय पर्वणी ठरली.
कल्याणच्या सांस्कृतिक क्षेत्रात या कार्यक्रमाने वेगळी छाप उमटवली असून भविष्यातही अशाच प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.














Leave a Reply