नालेसफाईसाठी बालमजुराचा वापर; केडीएमसीच्या ठेकेदारावर गुन्हा

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशानंतर कारवाई; कोलसेवाडी पोलिसांकडून तपास सुरू

कल्याण, प्रतिनिधी : रोशन उबाळे 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामात अल्पवयीन मुलाकडून काम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी केडीएमसीच्या नालेसफाईच्या कामाचा ठेका असलेल्या मे. सेक्युअर वन सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीचे संचालक वैभव मोरे यांच्याविरोधात कोलसेवाडी पोलिस ठाण्यात बालकामगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या कंत्राटी कामांमधील देखरेख आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कल्याण पूर्वेतील दुर्गामाता मंदिराजवळ सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामात एका अल्पवयीन मुलाला कामावर लावण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. आयोगाने संबंधित ठेकेदाराविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

या आदेशानंतर सहायक कामगार आयुक्त कार्यालय, कल्याण यांनी घटनास्थळाची माहिती आणि संबंधित बाबींची पडताळणी केली. त्यानंतर सहायक कामगार अधिकारी कस्तुरी राजेश महात्मे यांनी कोलसेवाडी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मे. सेक्युअर वन सिक्युरिटी सर्व्हिसेसचे संचालक वैभव मोरे यांच्याविरोधात बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, केडीएमसीच्या नालेसफाईच्या कंत्राटी कामात संबंधित अल्पवयीन मुलाकडून प्रत्यक्ष नाल्यात उतरून काम करून घेतले जात होते. बालकामगारांना अशा धोकादायक आणि आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या कामांमध्ये रोजगार देणे कायद्याने गुन्हा मानला जातो. त्यामुळे या प्रकरणाला विशेष गांभीर्य प्राप्त झाले आहे. या घटनेमुळे केडीएमसीच्या विविध कंत्राटी कामांमध्ये बालमजुरांचा वापर होत आहे का, तसेच संबंधित विभागांकडून कामांची प्रभावी तपासणी केली जाते का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ संबंधित ठेकेदारावर कारवाई करून न थांबता अशा प्रकारांना जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटना आणि बालहक्क कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. दरम्यान, कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून, या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *