ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांची प्रमुख उपस्थिती
पारंपरिक वेशभूषा, गीत-नृत्य आणि कौटुंबिक स्नेहसोहळ्याने रंगला तीज महोत्सव
टिटवाळा , 31 ऑगस्ट 2026 : अजय शेलार
भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था आणि समस्त गोर बंजारा समाज बांधव, टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे यांच्या वतीने आयोजित पारंपरिक तीज महोत्सव विसर्जन आणि कौटुंबिक स्नेहसोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर हॉलमध्ये रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बंजारा समाजाचा पारंपरिक तीज महोत्सव हा पवित्र श्रावण महिन्यात साजरा केला जाणारा श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गाशी घट्ट नाते सांगणारा महत्त्वाचा पारंपरिक सण आहे. या उत्सवाच्या माध्यमातून बंजारा समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जाते. तीज महोत्सवादरम्यान बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषा, फेटिया आणि काचळी, तसेच पारंपरिक गीत-संगीत आणि डफडाच्या तालावर सादर होणाऱ्या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. बंजारा भगिनींनी पारंपरिक गीत आणि नृत्य सादर करत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
टिटवाळा परिसरात वास्तव्यास असलेले अनेक बंजारा समाज बांधव-भगिनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई व आसपासच्या परिसरात येऊन स्थायिक झाले आहेत. समाज बांधवांकडून अनेक वर्षांपासून पारंपरिक तीज उत्सवाची परंपरा जपली जात आहे. या सोहळ्यामुळे समाजातील बांधवांना एकत्र येण्याची तसेच आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याची संधी मिळते. या कार्यक्रमाला ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार मेहरबान राठोड (IPS), माजी उपमहापौर तथा केडीएमसी नगरसेविका सौ. उपेक्षाताई भोईर, नगरसेवक बंदेश जाधव, माजी नगरसेवक मयुर पाटील, श्री शक्तिवान भोईर, भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था महाराष्ट्र राज्याचे सचिव अनिल राठोड तसेच कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सरला काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करत तीज महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. पारंपरिक लोककला, गीत आणि नृत्याच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.तीज महोत्सव विसर्जन आणि कौटुंबिक स्नेहसोहळा यशस्वी करण्यासाठी नायक जयसिंग राठोड, कारभारी संतोष चव्हाण तसेच भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था आणि समस्त समाज बांधवांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा पारंपरिक उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.














Leave a Reply