ओला कार ड्रायव्हर बरोबर काय घडले ? अखेर सगळी घटना आली समोर

मैत्रिणीला भेटण्यासाठी निघालेल्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्याकडून चालकाचा गळा चिरला

टिटवाळा : टिटवाळा परिसरात काही दिवसांपूर्वी रक्ताने माखलेली उबेर कार आढळून आल्याने निर्माण झालेल्या खळबळीच्या घटनेचा अखेर उलगडा झाला असून या प्रकरणाने संपूर्ण ठाणे जिल्हा हादरून गेला आहे. सुरुवातीला चालक बेपत्ता असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिस तपासात समोर आलेली माहिती अधिकच धक्कादायक ठरली आहे. पुण्याकडे प्रवासासाठी कार बुक करणाऱ्या एका इंजिनिअरिंग विद्यार्थ्याच्या हातूनच चालकाचा खून झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणातील मृत चालकाचे नाव नासीर अन्सारी असे असून तो उबेर कंपनीसाठी कार चालवत होता. काही दिवसांपूर्वी टिटवाळा येथील गोवेली रोड परिसरात रक्ताच्या डागांनी माखलेली उबेर कार आढळून आली होती. चालक बेपत्ता असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. टिटवाळा पोलिसांसह ठाणे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) या प्रकरणाचा तपास हाती घेतला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि उबेर कंपनीच्या रेकॉर्डच्या आधारे तपास सुरू केला.

कारच्या रोड मॅपचा मागोवा घेत असताना पोलिसांना या गाडीचा शेवटचा प्रवासी आदर्श भालेराव असल्याचे समोर आले. आदर्श हा इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी असून तो आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पुण्याकडे जाण्यासाठी उबेर कार बुक करून निघाला होता. चालक नासीर अन्सारीने त्याला गाडीत बसवून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते; मात्र प्रवासादरम्यान घडलेल्या एका घटनेने या प्रवासाचे रूपांतर थरारक गुन्ह्यात झाले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कार गणेश खिंडी परिसरात पोहोचल्यावर चालक नासीर अन्सारीने अचानक गाडी थांबवली. त्यानंतर त्याने चाकूचा धाक दाखवत आदर्शकडे पैशांची मागणी केली असे आदर्शने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे . “तुझ्याकडे जे पैसे आहेत ते दे,” अशी धमकी देत त्याने प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगाने घाबरलेल्या आदर्शने प्रतिकार केला आणि दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. या झटापटीदरम्यान चालकाच्या हातातील चाकू आदर्शच्या ताब्यात आला. धक्काबुक्की सुरू असतानाच तो चाकू नासीरच्या गळ्याला लागला आणि त्याचा गळा चिरला गेला. गंभीर जखम झाल्याने नासीरचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर घाबरलेल्या आदर्शने मृतदेह तिथेच टाकून उबेर कार घेऊन टिटवाळ्याकडे पलायन केले. त्याने गोवेली रोड परिसरात कार सोडून घटनास्थळावरून फरार झाला. दुसऱ्या दिवशी ही रक्ताने माखलेली कार आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी कारचा मागोवा घेत तपासाची साखळी जोडली आणि अखेर संपूर्ण घटनेचा उलगडा झाला.

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. चालक नासीर अन्सारीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्याने काही दिवसांपूर्वी अनेकांकडे पैशांची मागणी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे प्रवाशाला लुटण्याच्या प्रयत्नातून ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र विद्यार्थ्याचा चालकाची हत्या करण्याचा पूर्वनियोजित हेतू नव्हता, असेही तपासात समोर आले आहे.

या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाची नोंद ओतूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. एका क्षणाच्या झटापटीत घडलेल्या या रक्तरंजित घटनेने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला, तर दुसऱ्या तरुणाचे आयुष्यही गुन्ह्याच्या गर्तेत ढकलले. क्षणिक संताप, भीती आणि परिस्थिती यांचा संगम कधी कधी किती भयंकर परिणाम घडवू शकतो, याचे हे हादरवून टाकणारे उदाहरण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *