कल्याण : अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावरून केडीएमसी प्रशासनाविरोधात तक्रारदार दत्ता तरे व पीडित हरेश अंकुश इंगळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
इंगळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, १३ मार्च २०२६ रोजी केडीएमसी अंतर्गत येणाऱ्या अ प्रभागातील वडवली भागात अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मिळावा यासाठी अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले; मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. उलट, कारवाईच्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी करून अडथळे निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात स्थानिक स्तरावर काही व्यक्तींनी हस्तक्षेप करून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केल्याचेही इंगळे यांनी नमूद केले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अधिकाऱ्यांची निष्क्रियता उघड झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही महिलांनीही कारवाई रोखण्यासाठी वातावरण तापवले, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे इंगळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई न झाल्यास २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता केडीएमसी मुख्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. इंगळे यांनी प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवणे, कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करणे आणि संबंधित कर्मचाऱ्यांची बदली करणे यांचा समावेश आहे.
या प्रकरणामुळे शहरात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













Leave a Reply