‘७ शाश्वत स्टेप’चा नवा मंत्र; कल्याण-डोंबिवलीत सुरक्षित व पर्यावरणपूरक शहरासाठी महापालिकेची मोठी मोहीम

नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत कल्याण डोंबिवली साक्षरता परीक्षा 2026

सोसायट्या आणि नागरिकांच्या दारी थेट पोहोचणारा उपक्रम; कचरा ते अग्निसुरक्षा पर्यंत सर्वसमावेशक कृती आराखडा जाहीर

कल्याण: रोशन उबाळे 

कल्याण-डोंबिवली शहराला शाश्वत आणि सुरक्षित दिशेने नेण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, १ मे २०२६ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित चर्चासत्रात “७ शाश्वत स्टेप” या व्यापक उपक्रमाची घोषणा करण्यात आली. आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेद्वारे शहरातील सोसायट्या, इमारती आणि नागरिकांना थेट सहभागी करून घेत पर्यावरणपूरक आणि सुरक्षित जीवनशैलीचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन, सांडपाण्याचा पुनर्वापर, वृक्ष लागवड, विद्युत सुरक्षा तपासणी आणि अग्निसुरक्षा उपाययोजना या सात महत्त्वाच्या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर संसाधनांचा योग्य वापर आणि सुरक्षेची खात्री करण्यासाठी या सात स्टेप अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कार्यक्रमादरम्यान विद्युत सुरक्षेसंदर्भातील विशेष पुस्तिकेचे प्रकाशन महापौर हर्षाली चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त अभिनव गोयल, नगरसेविका विजयताई पोटे, नगरसेवक गणेश जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, शैलेश मळेकर, अतिरिक्त शहर अभियंता जगदीश कोरे, प्रादेशिक संचालक भूषण मंकाने, मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, सहाय्यक अभियंता जितेंद्र शिंदे यांच्यासह अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

महापौर हर्षाली चौधरी यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना प्रत्येक नागरिकाने या सात स्टेप स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. तर आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले की, “शहराचा शाश्वत विकास हा केवळ प्रशासनाचा नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच शक्य आहे. सोसायट्या आणि रहिवाशांनी पुढाकार घेतला तरच या उपक्रमाला यश मिळेल.”

महापालिकेच्या या उपक्रमामुळे कल्याण-डोंबिवलीत सुरक्षितता, पर्यावरण संरक्षण आणि संसाधनांचे योग्य व्यवस्थापन याला मोठी चालना मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, या संकल्पनेचे यश नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असून, ‘७ शाश्वत स्टेप’ केवळ घोषणेत न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हीच खरी कसोटी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *