पालघर : निलेश कासट
दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी अपंग क्रांती संस्था (रजि.) पालघर जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
१५ मे २०२५ रोजी शासनाने दिव्यांग बांधवांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असले तरी अनेक दिव्यांगांना अद्याप UDID कार्ड मिळालेले नाही. तसेच विविध तांत्रिक कारणांमुळे संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक गरजू दिव्यांग बांधव शासनाच्या लाभापासून वंचित राहत असल्याची खंत संस्थेने व्यक्त केली आहे.
अपंग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात प्रशासनाने तातडीने विशेष शिबिरे आयोजित करून दिव्यांगांची नोंदणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांमधून वंचित राहिलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना प्राधान्याने लाभ द्यावा, असेही संस्थेने म्हटले आहे.
याशिवाय तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून गावागावातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. शासन निर्णयांनुसार लाभ मिळण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी जसे की PASS/FAIL, ई-केवायसी, आधार लिंकिंग आदी त्रुटी तात्काळ दुरुस्त करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच संपूर्ण तालुक्यात किती दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळाला, किती जणांचे UDID कार्ड प्रलंबित आहेत आणि किती जण लाभापासून वंचित आहेत याची सविस्तर माहिती जाहीर करून विशेष अभियान राबवावे, अशी मागणी अपंग क्रांती संस्थेने प्रशासनाकडे केली आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनील गुप्ता, उपाध्यक्ष संजय भानुशाली तसेच कार्याध्यक्ष विलास भणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. संस्था प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.













Leave a Reply