नवोदय परीक्षेत आष्टे शाळेचा ऐतिहासिक पराक्रम; सहा विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी

चंद्रकांत देसले /शहापूर

केंद्र शासनाच्या वतीने देशभर घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा अंतिम निकाल दि. १७ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला असून, शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा आष्टे (केंद्र ठुणे) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत इतिहास रचला आहे.
या परीक्षेत शाळेच्या सहा विद्यार्थ्यांनी यश मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. यामध्ये कु. जितेंद्र रवी करण, कु. आर्यन दिनेश वरकुटे, कु. युवराज सुनिल विशे, कु. प्राची दिनेश विशे, कु. प्रणव भरत सपाट आणि कु. पवन नागो मोंडुळा यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे कु. जितेंद्र रवी करण व कु. आर्यन दिनेश वरकुटे यांनी ठाणे जिल्हा परिषद आयोजित “मिशन भरारी” अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी भारत सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना CBSE पद्धतीनुसार बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. अशा स्पर्धात्मक परीक्षेत दुर्गम भागातील छोट्या शाळेने मिळवलेले हे यश विशेष ठरले आहे.
या यशामुळे शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामागे पंचायत समिती शहापूरचे गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे यांची प्रेरणा, विस्तार अधिकारी शिवानी पवार यांचे मार्गदर्शन तसेच केंद्रप्रमुख डॉ. विलास वेखंडे यांचे नियोजन लाभले.
विद्यार्थ्यांच्या यशासाठी मार्गदर्शक शिक्षक भगवान वरकुटे व राजाराम वेखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ मंडळ आष्टे, आदिवासी उन्नती मंडळ मुंबई, नॉलेज अकॅडमी शहापूर, फँड्री फाऊंडेशन, जाणीव प्रतिष्ठान शहापूर, स्व. काशिनाथ भोईर सर प्रतिष्ठान, दीपस्तंभ प्रतिष्ठान शहापूर, वेदांत केबल नेटवर्कचे रमेशदादा गोविंद विशे व कलायतन केंद्र ठुणे यांच्या सहकार्याने या यशाला बळ मिळाले.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळवत इतरांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *