शहापूर, प्रतिनिधी चंद्रकांत देसले : जि. प. केंद्रशाळा खराडे येथील विद्यार्थ्यांनी मंथन व लक्षवेध प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव जिल्हा व राज्य पातळीवर उज्ज्वल केले आहे. इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत अमेय हिरामण साबळे याने 150 पैकी तब्बल 134 गुण मिळवत जिल्ह्यात चौथा आणि राज्यात नववा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेतही अमेयने 150 पैकी 142 गुण मिळवत राज्यात पाचवा क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता ठळकपणे सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी इयत्ता पहिलीमध्ये असतानाच त्याने मंथन परीक्षेत सेंटर स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून आपल्या यशाची नांदी दिली होती, आणि यंदा त्याने त्या यशाला अधिक भक्कम उंचीवर नेले आहे.
अमेयच्या या यशासोबतच शाळेतील आणखी एक विद्यार्थी आरव अभिजित भोईर यानेही मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे जि. प. केंद्रशाळा खराडेची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मक वृत्ती अधोरेखित झाली आहे.
या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांची जिद्द व मेहनत हे महत्त्वाचे घटक असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. मार्गदर्शक शिक्षिका जयश्री पाटील, बाळकृष्ण निमसे, अनुजा रेरा तसेच वर्गशिक्षिका प्राची वेखंडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावली आहे.
या अभिमानास्पद यशामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण असून शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून दोन्ही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची नवी प्रेरणा मिळत असून, ग्रामीण भागातील शिक्षणाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.













Leave a Reply