टिटवाळ्यातील वाढत्या पाणीटंचाईवर महासभेत संताप; अमृत जल योजनेतील भूमिगत पाईपलाईन तातडीने सुरू करण्याची नगरसेवक बंदेश जाधव यांची मागणी

टिटवाळा  : मांडा पश्चिम परिसरात तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नाने अखेर केडीएमसी महासभेत जोरदार स्वरूप धारण केले. नागरिकांना भेडसावत असलेल्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अमृत जल योजनेअंतर्गत प्रस्तावित रेल्वे भूमिगत पाणी पाईपलाईन त्वरीत कार्यान्वित करावी, अशी ठोस मागणी नगरसेवक बंदेश जाधव यांनी सभागृहात मांडली.

गेल्या काही महिन्यांपासून टिटवाळा शहरासह मांडा पश्चिम भागात पाण्याचा तुटवडा दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून महिलांवर त्याचा सर्वाधिक ताण पडत आहे. त्यातच अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर नळजोडण्या वाढल्याने उपलब्ध पाणीपुरवठ्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महासभेत विषय मांडताना जाधव यांनी प्रशासनाला जाब विचारत, प्रस्तावित भूमिगत पाईपलाईन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. हा प्रकल्प मार्गी लागल्यास मांडा पश्चिमसह परिसरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच संबंधित विभागाने या प्रकल्पाकडे गांभीर्याने पाहून कोणताही विलंब न करता काम सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली. पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून त्यासाठी लोकांना झगडावे लागू नये, यासाठी प्रशासनाने तत्काळ निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, महासभेत झालेल्या या चर्चेनंतर प्रशासनाकडून नेमकी काय पावले उचलली जातात आणि टिटवाळ्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कितपत मार्गी लागतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *