श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त टिटवाळ्यात भक्तीमय पुण्यस्मरणाचा भव्य पालखी सोहळा

टिटवाळा : श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त टिटवाळा परिसरात भक्तीमय पुण्यस्मरणाचा भव्य सोहळा कार्यक्रमअसून, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित) केंद्र टिटवाळा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिकतेने भारावून जाणार आहे.

रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता या पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार असून, श्रद्धा आणि भक्तीचा संगम असलेली ही मिरवणूक टिटवाळ्यातील विविध प्रमुख मार्गांवरून पार पडणार आहे. मारुती मंदिर, पाटील नगर, साईबाबा कॉलनी, ज्ञानेश्वर महाराज मंदिर (पंचवटी), मल्हार चौक, गावदेवी मंदिर आणि टिटवाळा पोलीस स्टेशन परिसरातून ही पालखी मार्गक्रमण करणार आहे.

स्वामी समर्थांच्या नामघोषात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने निघणाऱ्या या पालखी सोहळ्यात अनेक  भजन मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार असून, प्रत्येक क्षण भक्तिमय वातावरणाने नटलेला असेल. पुण्यतिथी निमित्ताने केवळ उत्सव नव्हे, तर स्वामींच्या कार्याचे स्मरण, त्यांच्या शिकवणीचे चिंतन आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा हा पवित्र क्षण ठरणार आहे.

या सोहळ्यात सहभागी होत स्वामी समर्थांच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होण्याचे आणि पुण्यस्मरणाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कुटुंबियांसह उपस्थित राहून या दिव्य सोहळ्याचा अनुभव घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

टिटवाळा परिसरात या सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, भक्तांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. श्रद्धा, समर्पण आणि आध्यात्मिक एकात्मतेचा संदेश देणारा हा भक्तीमय पुण्यस्मरण सोहळा टिटवाळ्याच्या धार्मिक परंपरेत आणखी एक उज्ज्वल अध्याय जोडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *