कल्याण पूर्वेत ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग; प्रकाश ऊर्फ लल्ला विरोधात गुन्हा दाखल

Whatsapp image 2025 04 20 at 6.35.08 pm

कल्याण: रोशन उबाळे 

कल्याण पूर्वेतील कचोरे गावातील न्यू गोविंद वाडी भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेवर रस्त्यातच अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रकाश वनताळे ऊर्फ लल्ला या इसमाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर महिला आपल्या मुलासह न्यू गोविंद वाडी परिसरात वास्तव्यास आहे. दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास ती दुचाकीवरून जय भीम नगर भागातून टाटा पॉवर दिशेने जात होती. त्या मार्गावर दास नावाच्या दुकानाजवळ एक अनोळखी इसम रस्त्यात उभा होता. रस्ता अडवलेला असल्यामुळे महिलेने त्याला सौम्यपणे बाजूला व्हायला सांगितले. त्यावर तो इसम संतापला आणि “रस्ता तुम्हारे बाप का है क्या?” अशा आक्षेपार्ह भाषेत बोलून शिवीगाळ करू लागला.

महिलेने याला प्रत्युत्तर देत स्पष्टपणे सांगितले की “हा रस्ता ना माझ्या बापाचा आहे, ना तुझ्या बापाचा!” यावरून आरोपीचा राग अनावर झाला. संतप्त होऊन त्याने महिलेच्या छातीला हात लावला, तिची ओढणी ओढून खाली फेकली आणि तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे संबंधित महिला घाबरून गेली आणि तेथून तत्काळ निघून गेली.

घटनेचा धक्का बसलेल्या महिलेने सुरुवातीला कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, दुसऱ्या दिवशी १५ एप्रिल रोजी तिने आपल्या मुलासह त्या परिसरात परत जाऊन आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी मदत करत एक फोटो दाखवला, ज्यावरून महिलेला आरोपीची ओळख पटली. त्याचे नाव प्रकाश वनताळे ऊर्फ लल्ला असून तो पिसवली परिसरात राहतो, अशी माहिती तिला मिळाली.

महिलेने घरी परतल्यावर आपल्यावर घडलेल्या घटनेबाबत पतीला सांगितले. पतीने तिला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन अधिकृत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी प्रकाश वनताळे ऊर्फ लल्ला याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३५४ (विनयभंग), ३५१(२) (शारीरिक हल्ला), ३५२ (मारहाणीची धमकी व कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत असून, परिसरात या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या प्रकारातून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की सार्वजनिक ठिकाणी महिलांचे सुरक्षिततेचा प्रश्न अद्यापही गंभीर स्वरूपाचा आहे. पोलिसांनी त्वरीत कारवाई करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *