गटारी पार्टीचा गोंधळ : गाणं लावण्यावरून दोन गटात हाणामारी

Whatsapp image 2025 07 28 at 10.34.05 pm

टिटवाळा (प्रतिनिधी) – गटारी अमावस्येनिमित्त कल्याणजवळील रायते येथील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या पार्टीत गाणं लावण्यावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सात जणांविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना आदित्य फार्म हाऊसवर घडली. करण जाधव व मुकेश यादव हे दोघेही फार्महाऊसवर पार्टीसाठी आपल्या मित्रांसह आले होते. दोघे भावजी-मेव्हणे असून पूर्वी विकी भुल्लर या शिंदे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यासोबत काम करत होते. मात्र करणने काही दिवसांपूर्वी काम सोडले होते, त्यामुळे तो मुकेशवरही काम सोडण्यासाठी दबाव टाकत होता, असे समजते.

पार्टीदरम्यान गाणं लावण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाऊन तो मारहाणीपर्यंत गेला. जखमी करणच्या भावाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत विकी भुल्लर व त्यांच्या साथीदारांनी करणवर लाकडी दांडके, हॉकी स्टिक व हातोड्याने हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

टिटवाळा पोलीसांनी विकी भुल्लर, हैप्पी भुल्लर, सनी भुल्लर, मुकेश यादव, सचिन शेवाळे, मनी अण्णा, रमु व डॅनी या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. करण जाधवच्या आई सुनिता जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप फेटाळले. त्यांनी सांगितले की, “करण हा विकी भुल्लरवर काम सोडल्यापासून मुकेशला त्रास देत होता. विकी भुल्लर यांचा या भांडणाशी काहीही संबंध नाही. उलट भांडण थांबवण्यासाठी त्यांना फोन करून बोलावलं गेलं होतं.”

मुकेश यादवची पत्नी नैना हिचंही म्हणणं आहे की, “करण हा माझा सख्खा भाऊ असून त्यानेच भांडण उकरून काढलं. विकी भुल्लर व त्यांच्या सहकाऱ्यांचा यात काही सहभाग नव्हता, तरीही त्यांचं नाव गुन्ह्यात घेतलं जात आहे.”

तत्कालीन स्थितीत, पोलीस दोन्ही बाजूंच्या साक्षी व पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत. गुन्हा राजकीय हेतूनं दाखल करण्यात आल्याचा आरोप करण जाधव याने केल्यामुळे या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *