टिटवाळा: मांडा कोळीवाडा परिसरातील स्कॉर्पिओ जीप चोरीच्या घटनेला महिना उलटून गेला असला तरी, पोलिसांना अद्याप ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. जय मल्हार चौकात पार्क करण्यात आलेली ही जीप 21 डिसेंबर रोजी चोरीला गेली होती. त्याच दिवशी काही दुकाने फोडल्याच्या घटना देखील घडल्या होत्या.
चोरीस गेलेली ही जीप बांधकाम व्यावसायिक गजानन भोईर यांची असून, घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र, जीपचा थांगपत्ता लागला नाही. यानंतर त्यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नागरिकांमध्ये या घटनेमुळे असुरक्षिततेची भावना वाढली असून ते चिंतेत आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. तपास अधिकारी नितीन मुदगुन आणि पोलीस कर्मचारी देसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडवली फाटकापर्यंतच्या सीसीटीवी फुटेजमध्ये चोरीची गाडी आढळली आहे. पुढील तपासासाठी भिवंडी, पडघा, घोटी, चारोटी तसेच इतर महामार्गावरील फुटेज तपासले जात आहेत.
याशिवाय, चोरीच्या गाड्यांचे सुटे भाग विकणाऱ्या ठिकाणांवरही याबाबत खबरी मार्फत माहिती घेणे सुरु आहे . अनेकदा अशा गाड्या राजस्थानमधील संचार या ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी नेल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याबाबतच्या घटनांची अधिक माहिती असलेल्या पुणे क्राईम ब्रांचशी समन्वय साधून अशा चोरीच्या घटनांमधील महत्त्वाचे धागेदोरे गोळा करण्यात येत आहेत. याशिवाय, चोरीच्या रात्रीच्या हद्दीतील आयडिया, बीएसएनएल, जिओ आणि एयरटेल नेटवर्कवरील कॉल रेकॉर्ड्सची तपासणी सुरू आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संशयिताचा ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि तपासाला गती द्यावी, अशी मागणी केली जात आहे.














Leave a Reply