टिटवाळ्यात बेफाम डंपरचा थरार; गणेश मंदिर रोडवर वाहनांची चिरडाचिरड, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Whatsapp image 2026 02 18 at 2.37.52 pm

फुटपाथांवर अतिक्रमणांचा विळखा; दिखावू कारवायांमुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

टिटवाळा : टिटवाळा शहर आज सकाळी अक्षरशः हादरले. टिटवाळा पूर्वेकडील मुख्य गणेश मंदिर रोडवर सुमारे सकाळी ११ च्या दरम्यान एका भरधाव आणि नियंत्रण सुटलेल्या डंपर/ट्रेलरने धुमाकूळ घालत अनेक वाहनांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. बनेलीकडून टिटवाळा स्टेशनच्या दिशेने येणाऱ्या या जड वाहनाने रिक्षा स्टँडजवळील मुख्य रस्त्यावर, बिकानेर मिठाई दुकानासमोर काही क्षणांतच समोरून येणाऱ्या तसेच रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांना जोरदार धडक दिली. RJ-19 GG 4670 असा क्रमांक असलेले हे वाहन पुढेही न थांबता गणेश मंदिराच्या दिशेने वेगाने धावत पटेल मार्ट परिसरात जाऊन एका डिव्हायडरला धडकून थांबले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ही घटना अतिशय गंभीर स्वरूपाची होती .

प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मते, संबंधित चालक अतिशय बेफिकीर आणि संशयास्पद पद्धतीने वाहन चालवत होता. काहींनी चालक नशेच्या अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या भीषण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हजारो नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही वाहनचालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, संबंधित डंपर पूर्णपणे लोडेड असल्याचे दिसून आले. वाहनावर निळ्या रंगाचे रिकामे ड्रम ठेवण्यात आले होते; मात्र ते केवळ दर्शनी स्वरूपाचे असून वाहनामध्ये इतर काही वस्तू लपविण्यात आल्याचा संशयही नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. या बाबीची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Whatsapp image 2026 02 18 at 2.37.50 pm
दरम्यान, अपघातानंतर काही ठिकाणी “ब्रेक फेल” झाल्याच्या अफवा पसरू लागल्या. मात्र नागरिकांच्या मते अनेक वाहनांना धडक दिल्यानंतरही संबंधित डंपर व्यवस्थितपणे पोलिस स्थानकापर्यंत नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाडाचा दावा संशयास्पद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अफवांमुळे दोषींना पळवाट मिळू नये, यासाठी जबाबदारीने वागण्याची गरज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिस स्टेशन, टिटवाळा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करून मद्यप्राशन झाले होते का याची खातरजमा केली जाणार आहे. तसेच वाहनाची तांत्रिक तपासणी करून ब्रेक प्रणालीमध्ये बिघाड होता का, याचाही सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त वाहनांची नोंद घेऊन संबंधित वाहनमालकांच्या तक्रारी स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे गणेश मंदिर रोड व स्टेशन परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. आधीच नियमित होणारी वाहतूक कोंडी, अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त वाहतूक व्यवस्थापन किती धोकादायक ठरू शकते, याची जाणीव आज पुन्हा एकदा प्रकर्षाने झाली. वेळेत हस्तक्षेप झाला नसता, तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.

 

Whatsapp image 2026 02 18 at 2.37.51 pm
स्थानिकांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच टिटवाळा शहरातील जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण, चालकांची नियमित तपासणी, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई आणि वाहतूक व्यवस्थेचे तातडीने पुनरावलोकन करण्याची गरज अधोरेखित करण्यात येत आहे. नागरिकांची सुरक्षितता ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. आजच्या या थरारक घटनेने टिटवाळ्यातील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. आता प्रशासनाने केवळ कारवाईची भाषा न करता कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना राबविणे हीच काळाची गरज बनली आहे.

या भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक गंभीर मुद्दा समोर येत आहे. गणेश मंदिर रोडच्या दोन्ही बाजूंना असलेले फुटपाथ गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत टपऱ्या आणि फेरीवाल्यांनी अक्षरशः बळकावले आहेत. परिणामी, पादचाऱ्यांना नाईलाजाने थेट मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. ज्या रस्त्यावर आधीच वाहतुकीचा ताण आहे, त्याच रस्त्यावर नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागणे ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची साक्ष आहे. आजच्या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली; मात्र फुटपाथ मोकळे असते तर अनेक नागरिक संभाव्य धोक्यापासून वाचले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

नागरिकांचा आरोप आणखी गंभीर आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अनधिकृत फेरीवाल्यांशी आर्थिक साटेलोट असल्यामुळे कारवाया केवळ दिखावूपुरत्या केल्या जातात, असा थेट आरोप केला जात आहे. अधूनमधून कारवाईचे फोटो, पंचनामे आणि गाजावाजा होतो; मात्र काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. फुटपाथ पुन्हा अतिक्रमणांनी गजबजतात आणि पादचारी पुन्हा रस्त्यावर ढकलले जातात.

आजच्या अपघाताने शहरातील वाहतूक व्यवस्थेतील आणि अतिक्रमणविरोधी कारवाईतील ढिसाळपणा उघड केला आहे. या घटनेचा तरी बोध घेऊन महापालिका प्रशासन खऱ्या अर्थाने जागे होणार का? की पुन्हा एकदा कारवाईचा केवळ दिखावा करून सर्व काही विसरले जाणार? असा थेट आणि संतप्त सवाल आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *