ड्यूटी पेड विदेशी मद्याची सीलबंद बाटली फोडून नव्या बाटल्यांत भरणा – ‘दारू पुनर्भरण उद्योगा’चा पर्दाफाश
१८.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त, वाहनासह दोन आरोपी अटकेत – कल्याण तालुक्यात खळबळ
टिटवाळा (प्रतिनिधी) : कल्याण तालुक्यात बनावट विदेशी मद्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेली धडक कारवाई ही संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली आहे. ड्यूटी पेड विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्यांमधील मद्य काढून ते नव्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करण्याचा अत्यंत धोकादायक आणि बेकायदेशीर उद्योग उघडकीस आला असून, या कारवाईत तब्बल १८ लाख २१ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी मा. डॉ. राजेश देशमुख (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई), मा. प्रसाद सुर्वे (सहआयुक्त, अंमलबजावणी व दक्षता), तसेच मा. प्रदिप पवार (विभागीय उपआयुक्त, कोकण विभाग, ठाणे) यांच्या आदेशान्वये ही मोठी कारवाई राबविण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व मा. उत्तम शिंदे (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे-२) व अभिजीत देशमुख (उपअधीक्षक, कल्याण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने मुंबई-बडोदा प्रस्तावित हायवेवरील ब्रिज, टिटवाळा (प.) येथे दबा धरून कारवाई केली. सायंकाळी सुमारे १९:३५ वाजता पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा (MH-05-FJ-9142) या चारचाकी वाहनास अडवून तपासणी केली असता, वाहनातून १२,०५,१३० रुपयांचा बनावट विदेशी मद्य साठा, बनावट वाहतूक पास, बिले तसेच अधिकृत मे. राधा वाईन्स (FL-I, भिवंडी बायपास रोड) चे दस्तऐवज मिळून आले. वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त करून तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपी रोहन शशिकांत केणे याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच कोंढेरी, पो. मांडा, टिटवाळा (प.) येथील जयेश केणे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी अक्षरशः बनावट दारू कारखानाच सुरु असल्याचे उघड झाले. विनापरवाना मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे बनावट बुचे, प्लास्टिक जार, रिकाम्या काचेच्या बाटल्या, विविध ब्रँडचे लेबल्स, बनावट विदेशी मद्य व साहित्य असा तब्बल ६,१५,८८० रुपयांचा साठा आढळून आला.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, आरोपी हे अधिकृत FL-I ट्रेडमधून ड्यूटी पेड विदेशी मद्य घेऊन येत, १ लिटर, २ लिटर व ७५० मि.लि.च्या व्हिस्की, व्होडका व रमच्या बाटल्यांमधील मद्य काढून घेत त्या बाटल्यांमध्ये पाणी भरून पुन्हा सिल करून बाजारात विक्री करत होते. काढलेले मद्य हे १८० मि.लि.च्या रिकाम्या बाटल्यांत भरून, नवीन बुचे व कॅपिंग करून ते बनावट मद्य गिऱ्हाईकांना विकले जात होते. अशा प्रकारे चालवला जाणारा हा ‘दारू पुनर्भरण उद्योग’ म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळ करणारा गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, रोहन शशिकांत केणे व जयेश शाम केणे या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही संपूर्ण कारवाई श्री. दिपक परब (निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, ठाणे-२) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्यासोबत दुय्यम निरीक्षक टी.सी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक आर.व्ही. सानप, जवान एन.जे. शिरसाठ, एस.बी. धुमाळ व पंच कर्मचारी सहभागी होते. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक दिपक परब हे करीत आहेत. बनावट मद्याचा हा उद्योग केवळ आर्थिक गुन्हा नसून तो थेट नागरिकांच्या आरोग्य व जीवितावर घाला घालणारा असल्याने, राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही कारवाई जनतेच्या सुरक्षेसाठी मैलाचा दगड ठरत असून, दारू माफियांना स्पष्ट इशारा देणारी ठरली आहे.














Leave a Reply