निवडणूक ओळखपत्रांची चौकशी करण्याची मागणी

शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मानपाडा पोलिसांना दिले निवेदन

तर ही निवडणूक रद्द करावी व पुन्हा निवडणूक घेण्याची वैशाली दरेकर यांची मागणी

कल्याण कल्याण शीळ रोडवरील पिसवली येथे सापडलेल्या निवडणूक ओळखपत्रांची चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली असून शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मानपाडा पोलिसांना निवेदन देण्यात आलं. तर झालेली लोकसभा निवडणूक रद्द करावी व पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी माहाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार वैशाली दरेकर यांनी केली आहे. यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, धनंजय बोडारे, महिला जिल्हा संघटिका वैशाली दरेकर राणे, माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण, कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील, डोंबिवली पूर्व शहर प्रमुख अभिजीत सावंत, हेमंत चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीची पिसवली गेट जवळ मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्र रस्त्यावर सापडली होती. अनोळखी व्यक्ती एक गोणी भरून मतदान ओळखपत्र टाकून पसार झाला होतं तर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीने मतदान ओळखपत्र त्या ठिकाणाहून  गायब केल्याचा प्रकार घडला होता. मोठ्या प्रमाणात मतदान ओळखपत्र भर रस्त्यात आणून टाकल्यामुळे परिसरामध्ये गोंधळ उडाला होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मानपाडा पोलिसांना निवेदन देण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी पिसवली गावाच्या प्रवेश‌द्वारापाशी निवडणूक ओळखपत्रे सापडली आहेत ओळखपत्रे खरी आहेत की बनावट याबाबत चौकशी व्हावी. या ओळखपत्रातील व्यक्ती ह्या त्या परिसरात किंवा आजूबाजूच्या परिसरातील आहेत का याची चौकशी व्हावी. ओळखपत्रातील व्यक्तींनी मतदान केले आहे का? या बाबत विचारणा व्हावी, केले असल्यास कोणते ओळखपत्र त्यांनी वापरले ? आताच झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या ओळखपत्रांखेरीज अजूनही ओळखपत्रे या कल्याण लोकसभेमध्ये असू शकतात, तरी या सापडलेल्या ओळखपत्रांबाबत सखोल तसेच प्रामाणीकपणे चौकशी व्हावी व संबंधीतावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तर आता साडे सातशे, ते एक हजार  वोटर आयडी सापडले आहेत.  आणखी किती वोटर आयडी बनवले असतील हा संशोधनाचा विषय असून 2024 ची झालेली हि कल्याण लोकसभा निवडणूक संशयाच्या फेऱ्यात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करत ठोस कारवाई करावी.  अशाप्रकारे खोटे ओळखपत्र बनवले गेले असेल तर ही निवडणूक रद्द करावी व पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटिका तथा महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार वैशाली दरेकर राणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *