टिटवाळा :(वार्ताहर ): कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात आक्रमक पवित्रा घेत सलग तीन दिवस कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या आदेशानुसार, नव्याने पदभार स्वीकारलेल्या सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान ही मोहीम राबवली जात आहे.
शहाड, अटाळी, आंबिवली, मोहने, गाळेगाव, मोहिली, बल्यानी, उंभरणी, मांडा, टिटवाळा आणि गणेशवाडी या भागांतील अनधिकृत आरसीसी बांधकामे आणि चाळी जमीनदोस्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. काही ठिकाणी पाच मजली इमारती उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावरही कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, अनेक ठिकाणी बांधकामे अर्धवट स्थितीत थांबवण्यात आली आहेत. काही व्यावसायिक आपली बांधकामे जुन्या असल्याचे भासवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवत आहेत. मात्र, कोणत्याही तडजोडीला थारा न देता सर्व अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
यापुढे अनधिकृत बांधकामांना घरपट्टी टॅक्स आणि पाणी जोडणी मिळणार नाही, असा इशारा सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिला आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई न झाल्याने पूर्वी बदली झालेले सहाय्यक आयुक्त रमेश रोकडे यांच्या जागी प्रमोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी कारभार स्वीकारताच मोठ्या प्रमाणावर ही कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेच्या या धडक मोहिमेमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.















Leave a Reply