उपायुक्त शैलेश दोंदे यांनी केले उपक्रमाचे कौतुक
टिटवाळा : भिवंडी तालुक्यातील गोवे गावातील झोपडपट्टी भागातील मुलांसाठी आधार फाउंडेशनच्या वतीने एक छोटीशी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश भिक्षा मागणे, कचरा वेचणे, माळा विकणे यांसारखी कामे करणाऱ्या गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा आहे. भिवंडी महानगरपालिकेचे उपायुक्त शैलेश दोंदे यांनी नुकतीच या शाळेला भेट दिली . यावेळी उपस्थित राहून त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. “समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गोडी पोहोचवण्यासाठी आधार फाउंडेशनने घेतलेला पुढाकार अत्यंत स्तुत्य आहे. अशा मुलांना मोफत शिक्षण देणे ही खरोखरच प्रेरणादायी बाब आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे,” असे उपायुक्तांनी सांगितले. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “समाजातील वंचित गटांसाठी हा उपक्रम लक्षणीय आहे.”
या शाळेमध्ये सध्या वयाच्या ५ ते १२ वर्षांदरम्यानची सुमारे ५० मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना मुलभूत शिक्षणाबरोबरच आरोग्य, स्वच्छता आणि नैतिक मूल्यांचीही माहिती दिली जात आहे. फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या मदतीने ही शाळा चालवली जात असून, मुलांना मोफत पुस्तके, वह्या आणि शिक्षण साहित्यही पुरवले जात आहे. आधार फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करून अधिक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्याचा त्यांचा मानस आहे. स्थानिक नागरिक आणि पालक वर्गाकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामुळे गोवे गावातील झोपडपट्टीमधील अनेक कुटुंबांमध्ये शिक्षणाबाबत नवीन आशा निर्माण झाली आहे.














Leave a Reply