रायगावजवळ भीषण अपघात : बेदरकार ट्रक चालकाच्या धडकेत सहा वर्षीय मुलाचा मृत्यू, आजोबा व आई किरकोळ जखमी

Whatsapp video 2025 04 20 at 3.17.56 pm.00 01 56 03.still010

कल्याण तालुका – रायगाव, खडवली रस्त्यावर दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६:३० वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. टिटवाळा येथून रायगावच्या दिशेने जात असताना एका निष्काळजी ट्रक चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत एका मोटारसायकलला जबर धडक दिली. या अपघातात सहा वर्षीय जिग्नेश निकेश राऊत या निष्पाप बालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त मोटारसायकलवर जिग्नेश त्याची आई सौ. पुनम राऊत आणि आजोबा विजय गटल्या पाटील यांच्यासह प्रवास करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय गटल्या पाटील (वय ५८ वर्ष, रा. आणे, पो. पडघा, ता. भिवंडी) हे आपल्या मालकीची मोटारसायकल (क्रमांक MH04 EM 2980) चालवून रायगावमार्गे टिटवाळ्याकडे जात असताना, रायगाव बसस्टॉपजवळील वळणावर टिटवाळ्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या टाटा ट्रक (क्रमांक MH07 C 1000) ने जोरदार धडक दिली. ट्रकचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून मोटारसायकलला जबर धक्का दिला, त्यात जिग्नेश याच्यावरून ट्रकचे पुढील चाक गेले व त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत पुनम राऊत व विजय पाटील यांना किरकोळ दुखापत झाली असून मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे.

अपघात घडल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून आरोपी चालकाविरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक २१३/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहितेचे कलम १०६(१), २८१, १२५(ए), १२५(बी) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कलम १८४ व १८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून निष्पाप जिग्नेशच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रदीप कदम करत आहेत. अपघातानंतर वाहनचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित चालकावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *