केडीएमसी मुख्यालयाबाहेर तरुणावर बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
तरुणीला धक्का लागल्याच्या वादातून तिघांकडून हल्ला; पत्रकारांच्या हस्तक्षेपामुळे तरुणाचा जीव वाचला
कल्याण : केडीएमसी (कल्याण-डोंबिवली महानगरपालिका) मुख्यालयासमोर भरदिवसा एका तरुणाला तिघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नाशिकवरून खाजगी कामासाठी आलेल्या या तरुणावर तरुणीला धक्का लागल्याच्या आरोपावरून हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण केडीएमसी मुख्यालय परिसरात असताना काही तरुणांशी त्याचा किरकोळ वाद झाला. यानंतर तिघांनी मिळून त्याला रस्त्यावर आडवे पाडत लाथा-बुक्क्यांनी निर्दयीपणे मारहाण केली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना पालिका मुख्यालयासमोरच, सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत घडली. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
मारहाणीदरम्यान उपस्थित पत्रकारांनी तत्काळ मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणासह मारहाण करणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या मुख्यालयासमोरच अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून संबंधितांवर कडक कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
पहा व्हिडीओ बातमी :👉🏽 https://www.youtube.com/watch?v=32_8FMt4raY














Leave a Reply