कल्याण, प्रतिनिधी : रोशन उबाळे
कल्याण युसुफ हाइट्स शस्त्र प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. गोविंदवाडी परिसरातील युसुफ हाइट्स इमारतीत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात घरातून चार धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात असलेल्या युसुफ हाइट्स इमारतीत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, निवासी भागातच धारदार शस्त्रांचा साठा सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई करत संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीत कार्यरत असलेल्या बाजारपेठ पोलिसांना एका घरात बंदूक लपवून ठेवण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांच्या विशेष पथकाने तात्काळ युसुफ हाइट्स इमारतीत धाड टाकली. मात्र, तपासादरम्यान घरात बंदूक आढळून न आल्याने पोलिसांनाही काही काळ संभ्रम निर्माण झाला.
तथापि, सखोल झडती घेतली असता घरातून चार धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. या शस्त्रांचा स्वरूप आणि त्यांची संख्या पाहता, संभाव्य गुन्हेगारी कृत्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी तत्काळ ती शस्त्रे ताब्यात घेत संबंधितावर कारवाई केली.
युएस सय्यद असे या प्रकरणातील तरुणाचे नाव असून, तो मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय करतो. पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले की, ही शस्त्रे त्याच्या वडिलांच्या उपस्थितीत घरात ठेवण्यात आली होती. मात्र, ती शस्त्रे नेमकी कोणत्या कारणासाठी आणण्यात आली, तसेच ती कोणी आणली याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्या या उत्तरामुळे संशय अधिक गडद झाला असून, पोलिसांनी चौकशीची दिशा अधिक तीव्र केली आहे.
दरम्यान, निवासी इमारतीत अशा प्रकारे धारदार शस्त्रांचा साठा आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामागील नेमका उद्देश काय होता, याचा कसून तपास बाजारपेठ पोलीस करत असून, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे कल्याण शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.














Leave a Reply