डहाणू : बोगस पत्रकारांचा सुळसुळाट, खंडणीखोरीचे प्रकरणे उघडकीस

Whatsapp image 2025 06 02 at 4.32.04 pm (1)

निलेश कासट

जून डहाणू (पालघर)

डहाणू तालुक्यात सध्या बोगस पत्रकारांची संख्या झपाट्याने वाढत असून, पत्रकारितेच्या नावे सुरू असलेल्या खंडणीखोरीचे गंभीर प्रकार उघडकीस येत आहेत. ग्रामीण भागात विविध यूट्युब चॅनेल सुरू करून काही व्यक्ती बनावट ओळखपत्रांच्या आधारे स्वत:ला पत्रकार म्हणून सादर करत असून, स्थानिक व्यावसायिक, दुकानदार, राजकीय व्यक्ती व इतर नागरिकांना धमकावून आर्थिक वसुली करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.

हे कथित पत्रकार कोणत्याही अधिकृत वृत्तसंस्थेशी संबंधित नसताना, समाज माध्यमांचा वापर करून खोट्या बातम्या, बदनामीकारक माहिती प्रसारित करण्याची धमकी देऊन नागरिकांना मानसिक त्रास देत आहेत. अनेकवेळा या बोगस पत्रकारांनी स्थानिक गुन्हे उघडकीस आणल्याचे भासवून स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी वसुली केल्याचे देखील आढळून आले आहे.

या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने पत्रकारितेचे काम करणाऱ्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील पत्रकारांची विश्वासार्हता धोक्यात येत असून, समाजात खरी पत्रकारिता बदनामीला सामोरी जात आहे. त्यामुळे अधिकृत पत्रकार संघटनांनी या बोगस पत्रकारांविरोधात आवाज उठवला असून, त्यांनी अशा बनावट पत्रकारांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.

बोगस पत्रकारांविरोधात कठोर भूमिका – पत्रकार संघटना आक्रमक

पत्रकार संघटनांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा बोगस पत्रकारांकडून कोणीही खंडणी मागितल्यास किंवा पत्रकार असल्याचे भासवून धमकावल्यास, तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. यासोबतच अशा घटनांची माहिती स्थानिक पत्रकार संघटनांनाही देण्यात यावी, जेणेकरून योग्य ती कारवाई करता येईल.

डहाणूत पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेला हा बोगस उद्योग थांबवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन व पत्रकार संघटना एकत्र येऊन कठोर पावले उचलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांनी काही संशयितांवर लक्ष ठेवले असून, लवकरच कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *