विवेकभाऊ पंडित यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान • राज्याध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्याकडून सन्मान
टिटवाळा : एकेकाळी रिक्षा चालवत घरखर्च भागवणारा आणि स्पर्धा परीक्षांसाठी झगडणारा युवक आज श्रमजीवी संघटनेच्या कल्याण तालुक्याच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहे. वासुदेव वाघे यांची ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक मा. विवेकभाऊ पंडित व राज्याध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक करण्यात आली.
म्हसकल (ता. कल्याण) येथील कातकरी समाजातील वाघे यांचा प्रवास संघर्षमय पण प्रेरणादायी ठरला आहे. आर्थिक अडचणींच्या सावटाखालीही त्यांनी शिक्षण सोडले नाही. रायता हायस्कूलमधून बारावी आणि नंतर TYBA पूर्ण करताना त्यांनी स्वतः रिक्षा चालवली. शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा दिल्या, पण थोडक्याच फरकाने अंतिम टप्प्यावर यश हुकले. २०१० मध्ये त्यांच्या मातोश्रीवर झालेल्या अन्यायानंतर श्रमजीवी संघटनेने दिलेली साथ त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. त्या दिवसापासून ते संघटनेशी संपूर्ण निष्ठेने जोडले गेले. गेल्या १५ वर्षांत त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. कातकरी घटक प्रमुख म्हणून ५ वर्षे आणि तालुका प्रभारी अध्यक्ष म्हणून ६ महिन्यांच्या अनुभवाच्या जोरावर आता त्यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
“ही जबाबदारी केवळ सन्मान नाही, तर संघटनेच्या विश्वासाचं प्रतीक आहे. ताई, भाऊ आणि रामभाऊ वारणा सरांचे मी ऋणी आहे. संघटनेचं काम अधिक जोमाने आणि इमानेइतबारे पार पाडेन,” अशी भावना वाघे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात विवेकभाऊ पंडित यांनी वाघे यांचे मनापासून अभिनंदन केले. “वासुदेव वाघे यांचं नेतृत्व संघटनेला अधिक बळकट करेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संघटनेच्या सामाजिक लढ्यांतून घडलेलं हे नेतृत्व आता नव्या उंचीवर पोहोचले असून, आगामी काळात त्यांच्या कार्यातून समाजाला सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.














Leave a Reply