पूरग्रस्तांसाठी के. बी. के. इंटरनॅशनल स्कूलचा पुढाकार — मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेश सुपूर्द

Whatsapp image 2025 11 05 at 7.42.04 pm

टिटवाळा, वार्ताहर – मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने हजारो शेतकरी आणि नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक गावांतील शेती, घरे, जनावरं आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाल्या आहेत. या आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. समाजातील विविध घटक आपल्या परीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. खराडे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित के. बी. के. इंटरनॅशनल स्कूल तर्फे एक विधायक पाऊल उचलण्यात आले. पूरग्रस्तांना आर्थिक मदत पोहोचविण्याच्या हेतूने या शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुबराव खराडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश सुपूर्द केला. ही देणगी केवळ आर्थिक सहाय्य नसून, समाजाप्रती असलेल्या जबाबदार नागरिकत्वाचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.

या प्रसंगी आमदार नरेंद्र पवार यांनी शाळेच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक करताना सांगितले की, “शैक्षणिक संस्था केवळ शिक्षण देण्यापुरत्याच मर्यादित राहता कामा नयेत. समाज संकटात असताना, त्यांच्यासाठी पुढाकार घेणे हेच खऱ्या अर्थाने शिक्षणाचे सार्थक रूप आहे.” त्यांच्या या उद्गारांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेला हा आर्थिक हातभार केवळ सहाय्य नसून, सामाजिक संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण ठरला आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात ऐक्य, जबाबदारी आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत होते. के. बी. के. इंटरनॅशनल स्कूलचा हा पुढाकार इतर शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांसाठी प्रेरणादायी ठरत असून, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नांना या मदतीमुळे नक्कीच बळ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *