वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांचे सर्वत्र कौतुक
स्थानिक नगरसेवक संतोष तरे यांचेही या कारवाईत मोलाचे सहकार्य
तर पालिका प्रशासनाच्या उदासीनतेवर नागरिकांनी केली सडकून टीका
टिटवाळा : अजय शेलार
टिटवाळा शहराच्या मध्यवर्ती भागात उभा राहिलेला ‘मृत्यूचा सापळा’ अखेर हटवण्यात आला आणि एका संभाव्य भीषण अपघाताला वेळीच आळा बसला. गणेश मंदिर रोड परिसरात उभा असलेला अर्धवट तुटलेला लोखंडी रेलिंग डिव्हायडर अनेक दिवसांपासून नागरिकांच्या जिवाशी खेळ करत होता. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशात हा लोखंडी सळईसारखा पुढे आलेला भाग वाहनचालकांसाठी घातक ठरत होता. प्रसारमाध्यमांनी या धोकादायक स्थितीवर प्रकाशझोत टाकताच प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आणि कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी या बाबीचे गांभीर्य लक्षात घेत स्वतः घटनास्थळी धाव घेत तत्काळ कारवाई केली.
गणेश मंदिर रोड हा टिटवाळ्यातील गजबजलेला मार्ग. सकाळ-संध्याकाळ वाहनांची वर्दळ, पादचाऱ्यांची चहलपहल आणि बाजारपेठेचा व्याप, शाळेच्या मुलांची वर्दळ या सगळ्यात रस्त्याच्या मधोमध उभा असलेला तुटका लोखंडी डिव्हायडर अक्षरशः संकटाचा इशारा देत होता. सिमेंटचा पाया उखडलेला, लोखंडी रेलिंग एका बाजूने मोडलेले आणि रस्त्यात धोकादायकरीत्या बाहेर आलेले — अशी परिस्थिती कोणत्याही क्षणी अपघातास कारणीभूत ठरू शकली असती. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही दुरुस्तीचा ठोस प्रयत्न होत नसल्याने नाराजी वाढत होती. ही बाब माध्यमांत झळकताच परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित झाले.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी प्रशासकीय कागदोपत्री प्रक्रियेची वाट न पाहता तातडीने पथकासह घटनास्थळी भेट दिली. धोकादायक स्थितीत असलेले लोखंडी रेलिंग त्वरित हटवण्याचे आदेश देत त्यांनी प्रत्यक्ष देखरेखीखाली ते रस्त्यावरून दूर केले. संभाव्य अपघात टाळण्यासाठी घेतलेली ही जलद आणि ठोस भूमिका नागरिकांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनाची संवेदनशीलता अधोरेखित करणारी ठरली. वस्तुतः रस्त्यावरील डिव्हायडरची देखभाल व दुरुस्ती ही पालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागाची जबाबदारी असताना, परिस्थितीची तीव्रता ओळखून पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतल्याने परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. मात्र पालिका प्रशासनाच्या उदासीनतेवर नागरिकांनी सडकून टीका केली आहे .
याच वेळी स्थानिक नगरसेवक संतोष तरे यांचेही या कारवाईत मोलाचे सहकार्य लाभले. तरे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत काम तातडीने पूर्ण करून घेतले. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत भूमिका घेतल्याने कारवाई अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत झाली. स्थानिक प्रतिनिधी म्हणून तरे यांनी दाखवलेली तत्परता ही कौतुकास्पद असल्याचे नागरिकांनी नमूद केले.
या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. “कर्तव्यदक्ष आणि समाजभान जपणारे अधिकारी प्रत्येक खात्यात असतील तर प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होईल,” अशा शब्दांत अॅड. जितेंद्र जोशी यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या मते, जबाबदारी कोणाची यावर वाद घालण्यापेक्षा नागरिकांचे प्राण वाचवणे अधिक महत्त्वाचे असून, पंकज गिरी यांनी दाखवलेली तत्परता ही आदर्शवत आहे.
ही घटना केवळ एक रेलिंग हटवण्यापुरती मर्यादित नाही; ती प्रशासकीय संवेदनशीलतेची आणि उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारी आहे. शहरात विकासकामांच्या गडबडीत लहान वाटणाऱ्या दुर्लक्षांमुळे मोठे अनर्थ घडू शकतात. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी नियमित पाहणी, वेळेवर दुरुस्ती आणि सुरक्षाविषयक उपाययोजना यावर भर देणे अत्यावश्यक आहे. टिटवाळ्यातील या घटनेने एक धडा दिला आहे — जबाबदारीची जाणीव आणि तातडीची कृती यांची सांगड घातली, तर संभाव्य संकटांवर मात करणे अशक्य नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या या कृतीबदल सर्वत्र कौतुक होत आहे .















Leave a Reply