मानेखिंडात भक्तीचा महासागर उसळणार; तुकाराम बीज–शिवजयंतीनिमित्त त्रिदिवसीय चरित्रकथेचा वैचारिक जागर

शहापूर (प्रतिनिधी) : चंद्रकांत देसले

शहापूर तालुक्यातील मानेखिंड येथे संत परंपरेचा तेजोमय वारसा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा दैदिप्यमान उत्सव एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. संत तुकाराम महाराज बीज आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित भव्य त्रिदिवसीय ‘श्री संत जगतगुरु संत तुकाराम महाराज चरित्र कथा’ सोहळ्याने परिसरात आध्यात्मिक उर्जेची लहर उसळली असून, भक्ती, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाचा संगम साधणारा हा उपक्रम यंदा पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे. बुधवार दि. ४ ते शुक्रवार दि. ६ या कालावधीत कथा, हरिपाठ आणि कीर्तनांच्या माधुर्याने मानेखिंडचा प्रत्येक कोपरा अभंगांच्या स्वरांनी निनादणार आहे. संत तुकारामांच्या अभंगातून समता, नैतिकता आणि अध्यात्माचा गाभा उलगडत समाजमनाला प्रबोधनाची नवी दिशा देण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे, तर शिवछत्रपतींच्या जयंतीनिमित्त स्वराज्याची प्रेरणा, शौर्याची जाज्वल्य परंपरा आणि राष्ट्रनिष्ठेचा जागर घडवण्याचा संकल्प या सोहळ्यातून साकारला जाणार आहे.

या वर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत राष्ट्रीय कीर्तीचे भारूडकार ह.भ.प. हमीद महाराज सय्यद यांचे प्रबोधनपर भारूड. संत विचारांचे सार सर्वसामान्यांच्या भाषेत आणि हृदयाला भिडणाऱ्या शैलीत मांडण्याची त्यांची हातोटी समाजमनाला स्पर्शून जाणारी ठरते. त्यांच्या प्रभावी सादरीकरणातून अंधश्रद्धा, सामाजिक विसंगती आणि नैतिक अधःपतन यांवर नेमकी बोट ठेवत सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा दिली जाणार आहे. कथा आणि कीर्तनांच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे जीवनकार्य, त्यांच्या अभंगातील सार्वकालिक विचार आणि मानवतेचा संदेश यांचे सखोल विश्लेषण होणार असून, श्रोत्यांना केवळ भक्तिभाव नव्हे तर आत्मपरीक्षणाची दिशा देणारा हा प्रवास ठरणार आहे. संत आणि शिवचरित्र या दोन प्रवाहांचा संगम साधत अध्यात्म आणि राष्ट्रधर्म यांची सांगड घालण्याचा हा प्रयत्न ग्रामीण भागात वैचारिक चेतना प्रज्वलित करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या भव्य उपक्रमाचे आयोजन ब्रह्मलीन योगी रिद्धीनाथ सत्संग परिवार आणि ग्रामस्थ मंडळ, मानेखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या चार वर्षांत या कार्यक्रमाने भक्तीचा आणि सामाजिक एकात्मतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे; यंदाच्या वर्षीही अधिक व्यापक सहभागाची अपेक्षा व्यक्त होत आहे. धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन समाजमनात मूल्यांची पेरणी करणारा आणि नव्या पिढीला संतविचार व स्वराज्याच्या आदर्शांची ओळख करून देणारा हा त्रिदिवसीय सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता एक वैचारिक चळवळ ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मानेखिंडच्या मातीतून उमटणारा हा संतविचारांचा नाद आणि शिवप्रेरणेचा जागर परिसरातील प्रत्येक नागरिकाला अंतर्मुख करीत, समाजहिताच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची प्रेरणा देईल, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *