टिटवाळा : कल्याणजवळील आंबिवली परिसरातील मोहने-गाळेगाव आदिवासी पाड्यात बुधवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. भटक्या मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने अवघ्या सात वर्षांच्या खुशील शंकर वाघे या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि केडीएमसी क्षेत्रातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाने पुन्हा एकदा भयावह स्वरूप धारण केले. रोजंदारीवर संसार चालवणाऱ्या आई-वडिलांच्या कुशीतून हिरावलेला हा निरागस जीव केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी ठरल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र आहे.
प्राप्त माहितीनुसार, खुशीलवर कुत्र्याने अत्यंत क्रूर हल्ला करत गालाचा लचका तोडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. त्याचवेळी आणखी एका मुलालाही त्या कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती समोर आली असून तो मुलगा उपचाराधीन आहे. काही दिवसांपूर्वीच रेबीजच्या भीतीने ग्रासलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना ही शोकांतिका घडल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढला आहे.
बल्याणी चौक, उंभार्णी, मोहिली, गाळेगाव, जेतवननगर, तिपन्नानगर, आर. एस. टेकडी आणि मोहने परिसरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, त्यांच्या टोळक्यांचे रस्त्यावर वर्चस्व आणि नागरिकांवर होणारे हल्ले यामुळे दहशतीचे वातावरण आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार विशेषतः धास्तावलेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी महापालिका मुख्यालयात धाव घेत आयुक्त आणि महापौरांची भेट घेत तातडीने विशेष पथक राबवण्याची, व्यापक निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण मोहीम हाती घेण्याची तसेच ठोस कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते हेमंत गायकवाड यांनीही कचरा व्यवस्थापनातील ढिलाई, उघड्यावर टाकला जाणारा मांसकचरा आणि नियोजनशून्य नियंत्रणामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचा आरोप करत प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) हद्दीत भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. २००७ मध्ये पशुसंवर्धन विभागाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिलेल्या अहवालानुसार शहरात सुमारे १८ हजार ५३४ भटके कुत्रे असल्याचे नमूद केले होते. तर २०१२ च्या पशुगणनेनुसार क. डो. मनपा क्षेत्रात ५५ हजार इतकी श्वानाची संख्या असल्याची नोंद असल्याची माहिती केडीएमसी कडून देण्यात आली . सध्या सुरू असलेल्या पशुगणनेनुसार या भागात कुत्र्यांची संख्या ८०,०००च्या आसपास गेली असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
भटक्या कुत्र्यांचे कळप रस्त्यांवर दहशत माजवत आहेत. लहान मुले, वृद्ध आणि महिलांसाठी या कुत्र्यांचा धोका अधिक गंभीर झाला आहे. वाढत्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त असून, अनेक ठिकाणी हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर गंभीर पावले उचलत नाही, प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले न उचलल्याने नागरिकांमध्ये देखील तीव्र नाराजी आहे. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या भीतीने आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याने ये- जा करावी लागत आहे. मुख्य रस्त्यांवर आणि कचरा असलेल्या, तसेच चिकन – मटण विक्रीचे दुकान असलेल्या शहरातील अनेक भागांमध्ये हे कुत्रे झुंडीने फिरत असून, अचानक हल्ले करत आहेत. कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरणाच्या मोहिमा अपुऱ्या ठरत आहेत. विशेषतः, कचरा व्यवस्थापनाची कमतरता ही भटक्या कुत्र्यांच्या वाढीमागील एक महत्त्वाची कारणे आहे.
टिटवाळ्यात देखील अश्याच पद्धतीच्या अनेक ठिकाणी श्वान हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या आणि ठोस उपाययोजनांची मागणी जोर धरत होती. टिटवाळ्यातील त्या परिस्थितीत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका झाली होती आणि निर्बीजीकरण, लसीकरण व विशेष पकड मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली होती. आज वर्ष उलटत असताना कल्याणजवळील आदिवासी पाड्यात घडलेली ही शोकांतिका दाखवून देते की समस्या केवळ एका परिसरापुरती मर्यादित नाही; ती संपूर्ण शहरव्यवस्थेला पोखरणारी आहे.
टिटवाळ्यात अद्यापही काही भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आलेली नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. नागरिक रात्रीच्या वेळी बाहेर पडताना धास्तावलेले असतात, शाळकरी मुलांच्या पालकांमध्ये चिंता आहे आणि प्रशासनाकडून सातत्यपूर्ण, दीर्घकालीन धोरणाची अपेक्षा व्यक्त होत आहे. खुशीलच्या मृत्यूने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे—घटना घडल्यावर हालचाल आणि आश्वासने, की आधीच प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय? टिटवाळ्यापासून गाळेगावपर्यंत पसरलेल्या या भीतीच्या सावलीला दूर करण्यासाठी केवळ संवेदना नव्हे, तर ठोस, सातत्यपूर्ण आणि जबाबदार कृतीची गरज आहे; अन्यथा प्रत्येक शोकांतिका ही प्रशासनाच्या विलंबित प्रतिसादाची कायमची साक्ष ठरेल.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर गंभीर पावले उचलत नाही, प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले न उचलल्याने नागरिकांमध्ये देखील तीव्र नाराजी आहे. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या भीतीने आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याने ये- जा करावी लागत आहे. मुख्य रस्त्यांवर आणि कचरा असलेल्या, तसेच चिकन – मटण विक्रीचे दुकान असलेल्या शहरातील अनेक भागांमध्ये हे कुत्रे झुंडीने फिरत असून, अचानक हल्ले करत आहेत. कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरणाच्या अपुऱ्या ठरत असलेल्या मोहिमा आणि विशेषतः, कचरा व्यवस्थापनाची कमतरता ही भटक्या कुत्र्यांच्या वाढीमागील महत्त्वाची कारणे ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे .















Leave a Reply