टिटवाळा : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज होऊ घातलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या पत्रामुळे टळल्याची घटना समोर आली आहे. संबंधित प्रकरणात केडीएमसी प्रशासनाने लेखी पत्र देत कारवाईबाबतची माहिती स्पष्ट केल्यानंतर उपोषणाचा निर्णय मागे घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अ प्रभागात वडवली हद्दीतील मौजे मोहोने येथे उभ्या राहिलेल्या वादग्रस्त बांधकामाबाबत सुधाबाई तिवारी यांनी एका अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात कारवाई करण्यास आणि अनेक महिने उलटूनही माहिती अधिकारात मागवलेली संपूर्ण माहिती न मिळाल्याने प्रशासनाविरोधातसंबंधित व्यक्तींनी ९ मार्च रोजी केडीएमसीच्या वडवली येथील ‘अ’ प्रभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यामुळे आज सकाळी ११ वाजता उपोषणाला सुरुवात होण्याची शक्यता होती.
मात्र, उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या ‘अ’ प्रभाग कार्यालयाकडून संबंधितांना अ प्रभाग क्षेत्र अधिकारी जयवंत चौधरी यांनी लेखी पत्र दिले आहे . या पत्रात संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे नमूद करत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या अंतर्गत त्याबाबतची निष्कासनाची कारवाई दि. ११ मार्च रोजी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद असल्याची माहिती देण्यात आली.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या या पत्रामुळे परिस्थिती काही प्रमाणात निवळली असून, उपोषणाचा निर्णय सध्या मागे घेण्यात आल्याचे समजते. प्रशासनाने या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत संबंधितांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने योग्य वेळी हस्तक्षेप करून लेखी स्पष्टीकरण दिल्याने संभाव्य आंदोलन टळले. पुढील काळात या प्रकरणात प्रशासन कोणती कारवाई करते आणि संबंधित पक्ष काय भूमिका घेतात, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान अ प्रभाग सहा. आयुक्त जयवंत चौधरी यांच्यावर निष्क्रिय भुमिकेचा ठपका ठेवत विरोधात आठवड्या भरापुर्वीच टिटवाळा येथील नागरिकांनी देखील उपोषण पुकारले होते . त्यामुळे वारंवार जर सर्वसामान्य नागरिकांना उपोषणाचे मार्ग स्वीकारावे लागत असतील तर ही गंभीर बाब असल्याचे पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक गोविंद प्रजापती यांनी म्हटले आहे .
















Leave a Reply