कल्याण : रोशन उबाळे
थकित मालमत्ता कर न भरणाऱ्या करदात्यांविरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आता कडक भूमिका घेत थेट कारवाईला सुरुवात केली आहे. कर वसुलीला गती देण्यासाठी महानगरपालिकेकडून थकबाकीदारांवर नळजोडणी तोडणे आणि मालमत्ता सील करण्यासारख्या कठोर उपाययोजना राबविल्या जात असून प्रशासनाचा कारवाईचा बडगा उगारला आहे.
महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वसुलीत वाढ करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सन २०२५–२६ या आर्थिक वर्षातील कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष पातळीवर कामाला लागले असून थकबाकीदारांशी संपर्क साधून कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच विविध माध्यमांतून सातत्याने जनजागृतीही केली जात आहे.
तथापि, वारंवार सूचना देऊनही काही करदाते जाणूनबुजून मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे २२३ नळजोडण्या तोडण्यात आल्या असून ५३८ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.
याशिवाय मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करून थकीत कर वसूल करण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच संबंधित प्रभागांमध्ये थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे ३१ मार्च २०२६ पर्यंत सार्वजनिक सुट्ट्या तसेच शनिवार-रविवारही सुरू ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व थकबाकीदारांनी आपल्या मालमत्ता आणि नळजोडण्या सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ मालमत्ता कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन उपआयुक्त (कर) बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
जाहिरात















Leave a Reply