डोळखांब जंगलात भीषण वणवा; वनसंपदेचे मोठे नुकसान, पशुपक्षी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा

चंद्रकांत देसले /शाहापूर प्रतिनिधी 

डोळखांब परिसरातील जंगलात लागलेल्या भीषण वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान झाले असून दाट जंगल, झाडे-झुडपे, गवत आणि नैसर्गिक संपत्ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट यामुळे संपूर्ण परिसर काही काळ भयावह बनला होता.

या वणव्यामुळे जंगलातील अनेक पशु-पक्षी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना दिसून आले. आगीचा फैलाव वाढत असल्याने वन्यजीवांना आपले नैसर्गिक अधिवास सोडून जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. अनेक ठिकाणी गवत, झुडपे आणि लहान झाडे जळून खाक झाल्याने जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, वणवा वेळीच आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाने तातडीने पावले उचलणे आवश्यक होते. मात्र काही ठिकाणी आग बराच वेळ धगधगत राहिल्याने मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्राचे नुकसान झाले. यामुळे पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पर्यावरण सामाजिक संस्थेचे सचिव सुनील वेखंडे यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त करत वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी आणि वणवा रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. उन्हाळ्यात दरवर्षी वणव्याच्या घटना घडत असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे दिसून येत आहे. वन विभागाने गस्त वाढवणे, स्थानिक ग्रामस्थांना जागरूक करणे तसेच आग विझवण्यासाठी तातडीची यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *