कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीवर लगाम; शिस्त आणि पारदर्शकता वाढवण्याचा प्रशासनाचा निर्णय
कल्याण, प्रतिनिधी: कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरी प्रणाली तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विशाल शांताराम कुरकुटे यांच्या तक्रारीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत होत्या. नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती. काही ठिकाणी कर्मचारी उशिरा येणे किंवा कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणे ही बाब गंभीर बनली होती, ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन कामांवर होत होता.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विशाल कुरकुटे यांनी याबाबत प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने तातडीने पावले उचलत सर्व ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या प्रणालीची काटेकोर अंमलबजावणी केली जावी आणि कोणत्याही प्रकारची ढिलाई सहन केली जाणार नाही. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावर शिस्त, जबाबदारी आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, तसेच नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Leave a Reply