समाजसेवेचा व एकात्मतेचा संदेश देणाऱ्या कार्याची प्रभावी झलक
टिटवाळा : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर टिटवाळ्यातील एकविरा सोसायटी, इंदिरानगर परिसरात कोकण रहिवाशी मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्याचा उत्साह, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाने उपस्थित नागरिकांना एकात्मतेचा आणि सेवाभावाचा प्रभावी संदेश दिला. सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण होते. आकर्षक सजावट, पारंपरिक वेशभूषा आणि मंगलमय वातावरणामुळे सोहळ्याला विशेष उठाव प्राप्त झाला. कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध घटक एकत्र येत सणाचा आनंद साजरा करताना दिसले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष यशवंत परब (बुवा) आणि उपाध्यक्ष शंकर पेंडुरकर यांनी आपल्या मनोगतात मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. २०१५ साली गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी काही समविचारी व्यक्तींनी सुरू केलेले हे मंडळ आज वटवृक्षाप्रमाणे विस्तारले असून समाजात विश्वासार्ह ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
मंडळाने गेल्या काही वर्षांत सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा, जेष्ठ नागरिकांचा सन्मान, महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, कौटुंबिक सहली यांसह विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. याशिवाय गरजूंना कपड्यांचे वाटप, आर्थिक मदत, धान्य किट वितरण, तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करून मंडळाने समाजसेवेचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. विशेष म्हणजे कोरोना काळातही मंडळाने अत्यंत सक्रिय भूमिका बजावत लसीकरणासाठी मदत, अन्नधान्य पुरवठा आणि प्रशासनाशी समन्वय साधून विविध समस्यांवर उपाययोजना केल्या. स्थानिक पाणी व रस्ते समस्यांबाबतही मंडळाने पुढाकार घेत नागरिकांना दिलासा दिला.
या भव्य कार्यक्रमाचे नियोजन प्रकाश चौगुले आणि राजेंद्र पिंपुटकर यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडले. तसेच मनाली शिंदे यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सभासद, कार्यकारिणी सदस्य, सल्लागार आणि हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विविध सदस्यांनी एकजुटीने काम करत हा सोहळा संस्मरणीय बनवला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, सदस्य आणि नागरिकांनी एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. या सोहळ्याने कोकण रहिवाशी मंडळाच्या एकात्मतेची, समाजसेवेची आणि सांस्कृतिक परंपरेची ठळक प्रचिती सर्वांना दिली. “एकजुटीतून सेवा, सेवेतून समाजाचा विकास” या ब्रीदवाक्याला साजेसा हा वर्धापन दिन सोहळा टिटवाळ्यातील सामाजिक जीवनात एक प्रेरणादायी ठसा उमटवून गेला.















Leave a Reply