सुसाट पंजाब मेलखाली व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू; टिटवाळा स्थानकात खळबळ


अपघातामुळे रेल्वे वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत; ओळख अद्याप पटलेली नाही

टिटवाळा : मध्य रेल्वेच्या कल्याण–कसारा मार्गावरील टिटवाळा रेल्वे स्थानकात गुरुवारी (दि. २६ मार्च) रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास सुसाट धावणाऱ्या पंजाब मेलखाली येऊन एका अज्ञात व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून फिरोजपूरकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाडीखाली ही घटना घडल्याने स्थानक परिसरात खळबळ उडाली असून रेल्वे वाहतुकीवरही सुमारे एक ते दीड तास परिणाम झाला.

प्राथमिक माहितीनुसार, पंजाब मेल स्थानकात येत असताना जुन्या बंद रेल्वे फाटकाजवळ संबंधित व्यक्ती अचानक रुळांवर आली आणि गाडीखाली सापडली. अपघात इतका भीषण होता की त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अपघात की अन्य काही कारण, याचा तपास सुरू आहे.

घटनेनंतर स्थानकावरील प्रवासी व स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. रेल्वे प्रशासन व कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया हाती घेतली. काही काळ परिसरात मोठी गर्दी उसळली होती, त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या दुर्घटनेचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला असून काही गाड्या उशिराने धावल्या. सुमारे एक ते दीड तास वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, अशा प्रकारच्या वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी रुळ ओलांडताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

व्हीडीओ पहा :https://www.youtube.com/shorts/2iMkkgpuUgg 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *