ऊर्जा परिवर्तनातून महाराष्ट्राची झेप; महावितरणला राष्ट्रीय पातळीवर गौरव

स्वस्त व शाश्वत विजेकडे वाटचाल, लाखो रोजगारांची निर्मिती आणि वीजदरात दिलासा

मुंबई, दि. २९ मार्च २०२६ : ऊर्जा क्षेत्रात मोठा बदल घडवत महाराष्ट्राने स्वस्त आणि शाश्वत विजेकडे ठोस पाऊल टाकले आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत नवी दिल्ली येथे स्कोच समूहाच्या वतीने महावितरणला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यकारी संचालक भुजंग खंदारे आणि कार्यकारी अभियंता रोहित जोगदंड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ऊर्जा परिवर्तनाच्या धोरणातून राज्याच्या वाढत्या गरजांचा विचार करून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅननुसार सन २०३० पर्यंत ३९ हजार ५०० मेगावॅट हरित ऊर्जेसह एकूण ४५ हजार मेगावॅट विजेची भर पडणार आहे. त्यामुळे नवीकरणीय ऊर्जेचा वाटा १३ टक्क्यांवरून थेट ५२ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. या प्रक्रियेत सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन जवळपास ७ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

वीज खरेदीत मोठी बचत होणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. पुढील पाच वर्षांत वीज खरेदीमध्ये ८२ हजार कोटी रुपयांची बचत अपेक्षित असून त्यामुळे वीजदर हळूहळू कमी होणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने सन २०२९-३० पर्यंत सर्व वर्गवारीतील वीजदर कमी करण्यास मंजुरी दिली आहे.

महावितरणने ऊर्जा परिवर्तनाला गती देत विविध ऊर्जा स्त्रोतांमध्ये ७२ हजार ९१८ मेगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे दीर्घकालीन करार केले आहेत. यामध्ये ४७ हजार ३४७ मेगावॅट म्हणजेच सुमारे ६५ टक्के अपारंपरिक ऊर्जेचा समावेश आहे. या उपक्रमामुळे दरवर्षी सुमारे १० हजार कोटी रुपयांची बचत होणार असून क्रॉस सबसिडीचा बोजाही १३ हजार ५०० कोटी रुपयांनी कमी होणार आहे. याचा थेट फायदा औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना होणार आहे.

सौर ऊर्जा क्षेत्रात महावितरणने विशेष आघाडी घेतली आहे. शेतकऱ्यांना दिवसा आणि शाश्वत वीजपुरवठा देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०’ अंतर्गत १६ हजार मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प उभारले जात आहेत. या योजनेमुळे ११ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला असून ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेतून आणखी ८ लाख ८० हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. एकूण २० लाख ३६ हजार शेतकरी या उपक्रमातून लाभार्थी ठरले आहेत.

याशिवाय ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत राज्यात ५ लाख २ हजारांहून अधिक घरगुती ग्राहकांकडे १९०४ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे अनेक घरांचे मासिक वीजबिल शून्याच्या जवळ पोहोचले आहे.

ऊर्जा क्षेत्रातील या व्यापक परिवर्तनामुळे महाराष्ट्र स्वस्त, शाश्वत आणि आत्मनिर्भर विजेकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *