टिटवाळा : मुंबईतील सिद्धिविनायक महागणपतीच्या पवित्र भूमीतून, टिटवाळा शहरात रविवारी दैनिक ‘जन सम्राट टाईम्स’चे दिमाखदार प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. राज्याचे पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या वृत्तपत्राचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. यापूर्वी मंत्री पाटील यांच्या हस्ते ‘जन सम्राट टाईम्स’च्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आणि एका क्लिकद्वारे वृत्तपत्राची वेबसाईटही सुरू करण्यात आली, ज्यामुळे आधुनिक डिजिटल पत्रकारितेचीही नवी सुरुवात झाली.
टिटवाळा पश्चिमेतील सिद्धेश्वर हाईट्स मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमात ज्येष्ठ आंबेडकरी नेते तानसेनभाई नन्नवरे, आरपीआय आठवले गटाचे नेते अण्णासाहेब रोकडे, राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी, भीम आर्मीचे नेते राजू झनके, उद्योग क्षेत्रातील राजेंद्र पाटील, नगरसेवक बंदेश जाधव, नगरसेविका तेजश्रीताई गायकवाड, जळगाव जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तसेच सचिन पवार आणि अनिल पाटील, प्रमोद जाधव, प्रमोद नांदगावकर , विजय भोईर, सन्नी जाधव , दिलीप राठोड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
या प्रसंगी झालेल्या जाहीर सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना स्पष्टपणे सांगितले की, “वृत्तपत्रांमध्ये बातम्यांची खातरजमा करणारी सक्षम यंत्रणा असणे अत्यावश्यक आहे. जे घडते तेच सत्यतेने मांडले गेले पाहिजे. बातम्यांना वळण देऊन, वैयक्तिक हेतूने किंवा ठराविक अजेंड्याने सादर करणे योग्य नाही.” माध्यमांनी समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘जन सम्राट टाईम्स’ हे समाज घडविणारी पत्रकारिता करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संपादक मुकुंदराव शामराव नंन्नवरे यांच्याबाबत बोलताना मंत्री पाटील भावनिक झाले. “माझा मुकुंद मी टिटवाळावासियांकडे सोपविला आहे, त्याला साथ आणि पाठबळ द्या,” असे आवाहन करत त्यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक केले. पुढे ते म्हणाले, “आजच्या काळात वृत्तपत्र चालवणे सोपे नाही. आम्ही त्याला समजावून सांगितले होते की हा मार्ग कठीण आहे, पण ध्येयाने झपाटलेल्या मुकुंदने आपला निर्धार कायम ठेवला. त्याच्या या जिद्दीला माझा पूर्ण पाठिंबा आहे.” ४०० किलोमीटरचा प्रवास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याचे सांगत त्यांनी आपल्या स्नेहबंधांची जाणीव करून दिली. पुढील वर्धापनदिन मोठ्या प्रमाणात कल्याण येथे साजरा होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
संपादक मुकुंदराव नंन्नवरे यांनी आपल्या प्रास्ताविकात वृत्तपत्र सुरू करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, गेल्या तीन दशकांपासून सामाजिक चळवळीत आणि दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असताना, सामाजिक आणि चळवळीशी संबंधित बातम्यांना योग्य स्थान मिळत नसल्याची खंत जाणवत होती. याच जाणिवेतून स्वतःच्या खर्चातून ‘जन सम्राट टाईम्स’ची स्थापना करण्यात आली असून, समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या भव्य सोहळ्याने टिटवाळा शहरात पत्रकारितेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, ‘जन सम्राट टाईम्स’ हे वृत्तपत्र सत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.













Leave a Reply