कल्याण : रोशन उबाळे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्ताकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडत महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेने निर्णायक पकड मजबूत केली आहे. केडीएमसीच्या तीन अत्यंत महत्त्वाच्या समित्यांवर सभापतींची बिनविरोध निवड झाल्याने महापालिकेच्या कारभाराच्या चाव्या शिवसेनेकडे आल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समिती, शिक्षण समिती आणि महिला-बाल कल्याणसह विविध समित्यांवर निवड झाल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.
स्थायी समितीच्या सभापतीपदी महायुतीचे ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शिवन्ना शेट्टी यांची निवड करण्यात आली असून, शिक्षण समितीच्या सभापतीपदी अभिजीत सुजाता सदानंद थरवळ तर महिला-बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या सभापतीपदी सारिका सतीश जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी केवळ या तिघांचेच अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित झाली होती. सोमवारी (दि. ६) निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृत घोषणा करण्यात आली.
रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत या तिन्ही सभापतींची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे महायुतीचा केडीएमसीवरील प्रभाव अधिक बळकट झाला असून, पुढील काळात महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेनेची भूमिका निर्णायक राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, नव्याने निवड झालेल्या स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मागील सहा वर्षे पालिका प्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या कारभारात काही अनुचित प्रकार झाले असल्यास त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रशासनात खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रसंगी महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, आमदार राजेश मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, निलेश शिंदे, भाजपचे जतिन प्रजापती, शामल गायकर, मनसेचे गणेश लांडगे, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, महापालिका सचिव बाळासाहेब चव्हाण यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापतींचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले असून, आगामी काळात नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.














Leave a Reply