मांडा आरोग्य केंद्र की मद्यपींचा अड्डा? टिटवाळ्यात धक्कादायक प्रकार उघड; रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आरोग्य केंद्राच्या आवारात रात्री रंगतात  मद्यपान पार्ट्या; सकाळी बाटल्या, कचरा आणि घाणीने परिसर विद्रूप

टिटवाळा : अजय शेलार
नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेले टिटवाळा पश्चिमेतील मांडा प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या आरोग्यसेवेपेक्षा असामाजिक कारवायांमुळे अधिक चर्चेत आले आहे. आधीच दुरावस्था, अपुऱ्या सुविधा आणि अस्वच्छतेमुळे बदनाम झालेल्या या केंद्राचा परिसर आता रात्रीच्या वेळी मद्यपी आणि संशयित व्यक्तींचा अड्डाच बनल्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे. रात्री उशिरापर्यंत येथे खुलेआम मद्यपान सुरू असल्याने परिसरातील नागरिक, महिला कर्मचारी आणि उपचारासाठी येणारे रुग्ण भयभीत झाले आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही अज्ञात इसम आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस आणि आवारात बसून मद्यपान करतात. सकाळी परिसरात फुटलेल्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास, तंबाखूचे पुडे, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि कचऱ्याचे ढीग विखुरलेले दिसतात. ज्या ठिकाणी गरोदर माता, लहान मुले आणि वृद्ध नागरिक उपचारासाठी येतात, त्याच परिसरात सुरू असलेला हा प्रकार संतापजनक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

विशेष म्हणजे आरोग्य केंद्रालगतच केडीएमसीची संत ज्ञानेश्वर शाळा असून या परिसरातही यापूर्वी अशाच घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. “आरोग्य केंद्राच्या नावाखाली परिसर असामाजिक घटकांच्या ताब्यात गेला आहे का?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

मांडा परिसरात अद्याप आधुनिक रुग्णालयाची उभारणी झालेली नाही. जुनाट जिल्हा परिषद इमारतीत सुरू असलेले हे आरोग्य केंद्र आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. गळके छत, नादुरुस्त शौचालये, अपुरी जागा, भग्न संरक्षक भिंती आणि सुरक्षेचा अभाव या समस्या कायम असतानाच आता मद्यपींच्या वाढत्या वावरामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, रात्री कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने परिसर पूर्णपणे बेवारस पडतो. संरक्षक भिंती अनेक ठिकाणी तुटलेल्या असल्याने कोणीही सहज आत प्रवेश करू शकतो. त्यामुळे केवळ मद्यपीच नव्हे तर संशयित व्यक्ती आणि मोकाट जनावरांचाही वावर वाढला आहे. महिला कर्मचारी आणि आशा सेविकांनीही सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून रात्री अथवा पहाटे ड्युटीवर येताना भीती वाटत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून यापूर्वी अनेकदा पाहण्या आणि आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “फक्त कागदोपत्री हालचाली आणि आश्वासने, पण प्रत्यक्षात परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

या प्रकरणी आता नागरिकांनी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमणे, मजबूत कंपाउंड उभारणे आणि रात्री पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर घटना घडल्यास त्याला प्रशासनच जबाबदार असेल, असा थेट इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, टिटवाळ्यासाठी प्रस्तावित अत्याधुनिक महापालिका रुग्णालयाचा प्रश्न अजूनही रखडलेलाच असून वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य सुविधा कोलमडत चालल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ . दिपा शुक्ला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *