रस्त्यांवरच मांडला बाजार? मांडा-टिटवाळा पश्चिममध्ये अतिक्रमणाचा विळखा; पादचारी आणि वाहनचालक त्रस्त

टिटवाळा : मांडा-टिटवाळा पश्चिम परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसागणिक अधिक गंभीर होत असून आता फुटपाथनंतर थेट रस्त्यांवरच कब्जा होत असल्याचे चित्र समोर येत आहे. वासुंद्री परिसरासह अनेक मुख्य मार्गांवर सार्वजनिक जागांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आधीच पादचाऱ्यांसाठी असलेले फुटपाथ विविध स्टॉल, साहित्य, व्यावसायिक वस्तू आणि अनधिकृत मांडवांनी व्यापले गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. मात्र आता परिस्थिती आणखी गंभीर बनली असून काही ठिकाणी थेट रस्त्याच्या वाहतूक मार्गातच टेबल, स्टँड, मालसाठा आणि इतर साहित्य ठेवले जात असल्याने वाहनांच्या हालचालींनाही मोठा अडथळा निर्माण होत आहे.

विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत या अतिक्रमणाचा फटका सर्वाधिक बसत आहे. अरुंद झालेल्या रस्त्यांमुळे दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांना कसरत करत मार्ग काढावा लागत असून अपघाताचा धोका वाढत असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. काही भागांत वाहतूक कोंडीची समस्या तर नित्याची बनली आहे.

“फुटपाथ गेले, आता रस्तेही बळकावले जात आहेत का?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक रस्ते आणि फुटपाथ हे नागरिकांच्या सुरक्षित वापरासाठी असताना त्यावर वाढत चाललेला अनधिकृत कब्जा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याची टीका होत आहे.

नागरिकांच्या मते, वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता सार्वजनिक जागांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे.

दरम्यान, संबंधित प्रशासनाने तातडीने विशेष अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घ्यावी, नियमित पाहणी करावी आणि रस्ते व फुटपाथ मोकळे करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *