टिटवाळा स्टेशन परिसरात वाहतूक शाखेची धडक कारवाई; ५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल

. जितेंद्र जोशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू होताच प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

टिटवाळा, वार्ताहर : टिटवाळा स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन याविरोधात स्वतंत्र वाहतूक शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून विविध मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या तब्बल ४० दुचाक्यांवर कारवाई करण्यात आली असून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या एका वाहनचालकावर, वाहन चालविताना परवाना जवळ न बाळगणाऱ्या चार जणांवर तसेच विनायूनीफॉर्म वाहन चालविणाऱ्या सात वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत एकूण ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कल्याण तालुका पोलीस ठाण्यांतर्गत वाहतूक शाखेकडून टिटवाळा स्टेशन परिसरात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी. बी. घोरपडे, पोलीस शिपाई निलेश मोरे, पोलीस शिपाई अमित पवार आणि महिला पोलीस शिपाई वैशाली ढेरे यांनी ही कारवाई केली. स्टेशन परिसरातील बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, टिटवाळ्यासह ठाणे ग्रामीण परिसरासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष ॲड. जितेंद्र जोशी यांनी सातत्याने लावून धरली होती. वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारा शहर विस्तार, स्टेशन परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

ॲड. जितेंद्र जोशी यांनी काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक, तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी तसेच विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन टिटवाळ्यातील गंभीर वाहतूक समस्येचा मुद्दा मांडला होता. विशेषतः स्टेशन परिसरातील नो पार्किंगमुळे होणारी कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि नागरिकांचा होत असलेला त्रास लक्षात घेता स्वतंत्र वाहतूक विभागाची गरज त्यांनी अधोरेखित केली होती.

त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ठाणे ग्रामीण पोलीस दलात स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यान्वित करण्यात आली असून त्याचे परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागले आहेत. वाहतूक शाखा सुरू होताच प्रशासनाने धडक कारवाई मोहीम हाती घेतल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. स्वतंत्र वाहतूक शाखेमुळे आता टिटवाळ्यासह भिवंडी, कल्याण, पडघा, शहापूर, मुरबाड, वाशिंद, किन्हवली, टोकावडे आणि गणेशपुरी परिसरातील वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी होणार असल्याचे बोलले जात आहे. अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण, वाहतूक शिस्त, अपघात प्रतिबंध आणि रस्ते सुरक्षेला यामुळे मोठी मदत होणार आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आगामी काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *