माझ्यावरील आरोप खोटे आणि निराधार; निष्पक्ष तपासातून सत्य समोर येईल : नरेंद्र पवार

कल्याण, १७ सप्टेंबर २०२६ :मदत करण्याच्या बहाण्याने एका विवाहित महिलेवर भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाल्यानंतर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र पवार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला असून, आपल्यावरील आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच निष्पक्ष तपासातून या प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती समोर येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या प्रकरणामागे सामाजिक व राजकीय षडयंत्र असल्याचा ठाम संशय असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मात्र, कोणावरही तथ्यहीन आरोप करणार नसून निष्पक्ष आणि सखोल तपासातून संपूर्ण वस्तुस्थिती समोर यावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

नरेंद्र पवार यांनी सांगितले की, भारतीय संविधान, कायदा आणि न्यायव्यवस्थेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. तपास यंत्रणांना आपण संपूर्ण सहकार्य करणार असून, कायदेशीर प्रक्रियेतूनच या प्रकरणाला सामोरे जाणार आहोत. तपास निष्पक्ष झाल्यास सत्य निश्चितपणे जनतेसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भू-माफियाविरोधातील आंदोलनाचा संदर्भ

गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमाकडे लक्ष वेधताना पवार यांनी आपण ज्या भू-माफियाविरोधात आंदोलन करून आवाज उठवला होता, त्याच्याशी संबंधित एक व्यक्ती विरोधी पक्षातील काही लोकांसोबत पोलीस ठाण्यात उपस्थित असल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. त्यानंतर घडलेल्या घटनांमुळे आपल्या मनात काही गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र या घटनांचा आणि आपल्याविरोधात दाखल झालेल्या प्रकरणाचा परस्पर संबंध आहे किंवा नाही, याबाबत आपण कोणताही निष्कर्ष काढत नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. या सर्व बाबींची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी तपास यंत्रणांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘आरोप माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी वेदनादायी’

आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा उल्लेख करताना नरेंद्र पवार यांनी अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, शहराचे हित आणि अन्यायाविरोधात आपण भूमिका घेत आलो असल्याचे सांगितले. सार्वजनिक जीवनात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले, मात्र सत्य आणि न्यायाची बाजू कधीही सोडली नसल्याचे त्यांनी म्हटले.

सध्या आपल्यावर करण्यात आलेले गंभीर आरोप हे स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे पवार यांनी सांगितले. भावनेच्या भरात कोणतीही भूमिका न घेता कायदेशीर आणि संवैधानिक मार्गानेच या परिस्थितीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाची प्रतिमा प्रभावित होऊ नये म्हणून राजीनामा

या प्रकरणामुळे आपण ज्या राजकीय पक्षाशी जोडलेले आहोत त्या पक्षाची प्रतिमा आणि संघटनेची प्रतिष्ठा प्रभावित होऊ नये, या नैतिक भूमिकेतून पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे नरेंद्र पवार यांनी जाहीर केले.

हा निर्णय कोणत्याही दबावाखाली घेतलेला नसल्याचे स्पष्ट करताना, पक्षाचा राजीनामा देणे म्हणजे आपल्यावरील आरोप मान्य करणे नव्हे, असेही त्यांनी सांगितले. आरोप वैयक्तिक स्वरूपाचे असल्याने त्याची राजकीय किंमत पक्षाला किंवा सहकाऱ्यांना मोजावी लागू नये, या भूमिकेतून आपण राजीनामा देत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

‘कायदेशीर लढाई पूर्ण ताकदीने सुरू राहणार’

प्रकरण तपासाधीन असल्याने तपास प्रक्रियेवर परिणाम होईल असे भाष्य करणे टाळणार असल्याचे पवार यांनी सांगितले. या प्रकरणातील वस्तुस्थिती, आपली सविस्तर भूमिका आणि आपल्याकडे असलेली माहिती योग्य वेळी कायदेशीर प्रक्रियेद्वारे तपास यंत्रणांसमोर तसेच जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

“माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सत्याला काही काळ संघर्ष करावा लागू शकतो, मात्र सत्य दडपले जाऊ शकत नाही. अखेरीस सत्यच समोर येईल. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी संयम बाळगावा आणि अधिकृत तपासातून वस्तुस्थिती समोर येऊ द्यावी,” असे नरेंद्र पवार यांनी म्हटले.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपास आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेत निश्चित होणार आहे. नरेंद्र पवार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *