कासा विभागातील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; सुदाम कदम यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती

निलेश कासट – डहाणू (पालघर)

डहाणू तालुक्यातील कासा विभागात भाजपला धक्का देत अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी कासा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व सामाजिक कार्यात सक्रिय असलेले सुदाम कदम, ग्रामपंचायत सदस्या वैशाली महेश तांडेल, माजी पोलीस उपनिरीक्षक सुनील नलावडे, महेश तांडेल तसेच इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आनंदभाई ठाकूर, जिल्हा सरचिटणीस हरेश मुकणे, डहाणू तालुका अध्यक्ष विपुल राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश करमोडा व गणेश कासट यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, सुदाम कदम यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डहाणू तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कासा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढण्यास या पक्षप्रवेशाचा फायदा होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सध्या पालघर जिल्ह्यात, विशेषतः डहाणू विभागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची मोर्चेबांधणी वेगाने सुरू असून विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *