बुधाराम सरनोबतांची बंडखोरी, ‘मांडा–टिटवाळा–अटाळी परिवर्तन आघाडी’मुळे प्रस्थापित पक्षांत खळबळ

Ggg

टिटवाळा:(अजय शेलार )

टिटवाळा शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी आणि निर्णायक घडामोड घडताना दिसत असून, येणाऱ्या २०२६ च्या कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपमधून पोटनिवडणूक लढवत टिटवाळ्यात पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि त्यानंतर उपमहापौर पद भूषवलेले बुधाराम सरनोबत हे नाव एकेकाळी शहराच्या राजकारणात आशेचा, विश्वासाचा आणि धाडसी नेतृत्वाचा प्रतीक मानले जात होते.

सरनोबत यांची टिटवाळा येथील पहिली निवडणूक केवळ विजयापुरती मर्यादित न राहता टिटवाळ्याच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली होती. प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव, निर्णयक्षम नेतृत्व, जनतेशी थेट संवाद आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड यामुळे अल्पावधीतच ते जनतेमध्ये लोकप्रिय झाले. सामाजिक, शैक्षणिक, नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवत एक सक्रिय लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

२०२६ च्या महापालिका निवडणुकीत ते भाजपचे खात्रीलायक अनुसूचित जमातीचे उमेदवार म्हणून ओळखले जात होते. मात्र यावेळी त्यांच्या प्रभागात महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले. पॅनल पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीमुळे त्यांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारीची तयारी केली होती. पक्षाकडून तिकीट मिळेल, याबाबत त्यांना शंभर टक्के खात्री असतानाच युतीतील अंतर्गत राजकारण, गटबाजी आणि वरिष्ठ पातळीवरील निर्णयांमुळे अचानक तिकीट नाकारण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

हा निर्णय सरनोबतांच्या जिव्हारी लागणारा ठरला. पक्षासाठी निष्ठेने काम करूनही डावलले गेल्याची भावना त्यांच्या मनात घर करून गेली आणि याच क्षणापासून टिटवाळ्याच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. पक्षीय राजकारणाला छेद देत बुधाराम सरनोबत यांनी स्वतंत्र पॅनल उभारण्याचा धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला.

‘मांडा–टिटवाळा–अटाळी परिवर्तन आघाडी’ या नावाने त्यांनी स्वतंत्र आघाडी जाहीर करत निवडणूक रणांगणात थेट उडी घेतली. ही आघाडी केवळ निवडणूक लढवण्यासाठी नसून, स्थानिक स्वाभिमान, विकास आणि परिवर्तनाचा अजेंडा घेऊन मैदानात उतरल्याचे स्पष्ट होत आहे.

या परिवर्तन आघाडीच्या पॅनलमध्ये प्रभाग अ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून सचिन दिगंबर अल्हाट, प्रभाग ब मधून अनुसूचित जमाती महिला उमेदवार म्हणून त्यांच्या पत्नी सौ. अंजनाताई सरनोबत, प्रभाग क मधून नागरिकांच्या मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिला उमेदवार म्हणून सौ. नीताताई विजय देशेकर, तर प्रभाग ड मधून सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून मोरेश्वर (अण्णा) तरे यांचा समावेश आहे. सामाजिक समतोल, महिलांचे प्रतिनिधित्व, अनुभव आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेले हे चारही उमेदवार या आघाडीची मोठी ताकद मानले जात आहेत.

बुधाराम सरनोबत हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलने केली, शाळांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, वीज वितरणातील अन्यायाविरोधात आवाज उठवला, महिलांना गॅस सिलिंडरसाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी पुढाकार घेतला.
विशेष बाब म्हणजे हे सर्व कार्य त्यांनी कोणतेही संविधानिक पद नसताना, केवळ लोकहिताच्या भावनेतून केले आहे. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले हे स्वतंत्र पॅनल केवळ निवडणूक लढवण्यासाठी नव्हे, तर सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान देण्यासाठीच मैदानात उतरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या आघाडीचा विकासाचा अजेंडा स्पष्ट असून रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत नागरी सुविधा या प्रश्नांवर ठोस कृती करण्याचा त्यांचा निर्धार आहे. “विकास म्हणजे काय?” हे केवळ भाषणातून नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून दाखवून देण्याचा दावा परिवर्तन आघाडीने केला आहे.

तर त्यांच्या या बंडखोरीला समाजिक आणि राजकीय क्षेत्रातले वजनदार नाव असलेले विजय (भाऊ ) देशेकर यांनी शिवसेना शिंदे गटाने तिकीट नाकारल्याने त्यानी देखील सरनोबत यांची साथ देत आपली पत्नी सौ. नीताताई विजय देशेकर यांच्यासाठी एल्गार पुकारला आहे . दुसरीकडे समाजात प्रतिष्ठेचे नाव असलेले मोरेश्वेर (अण्णा) तरे यांना देखील अखेरच्या क्षणी दिलेला शब्द भाजपाने माघारी घेतल्याने त्यांची तिकीट हुकली त्यामुळे दुखावलेल्या अण्णा तरे यांनी भाजपाच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे . त्यांना साथ मिळत आहे ती दमदार नेतृत्व असलेल्या संदीप तरे यांची .दुसरीकडे विविध सामाजिक उपक्रमातून आंबिवली – अटाळी परिसरात आपली वेगळी आणि प्रभावी अशी ओळख निर्माण केलेले प्रभाग अ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून या पॅनलमध्ये प्रस्थापित पक्षांविरोधात मैदानात उतरलेले सचिन दिगंबर अल्हाट हे आहेत . अशी तगडी मंडळी घेऊन तयार झालेले हे पॅनल इतर सर्व विरोधकांना भारी पडेल असा सध्या नागरिकांचा सूर सर्वत्रच कानावर पडत आहे .
परिणामी, ‘मांडा–टिटवाळा–अटाळी परिवर्तन आघाडी’मुळे टिटवाळ्यातील प्रस्थापित पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली असून, निवडणूक आधीच रंगतदार होत असल्याचे चित्र आहे. आगामी निवडणूक ही केवळ उमेदवारांची लढत नसून, नेतृत्व, स्वाभिमान आणि परिवर्तनाची लढाई ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. बुधाराम सरनोबतांची ही बंडखोरी टिटवाळाच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *