सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर नवरात्रोत्सवाच्या बॅनरचे अतिक्रमण; शहराच्या सुरक्षेलाच धोका!
पोलिसांकडून सूचना देऊनही बॅनर हटविण्याबाबत कार्यवाही नाही
गुन्ह्यांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज मिळण्यास अडथळे येण्याची शक्यता
टिटवाळा : (अजय शेलार )
शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांसाठी महत्त्वाचे साधन ठरतात. शहराचा तिसरा डोळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या घटनांचे चित्रीकरण होते. मात्र, टिटवाळ्यात गणेश मंदिर रोडवरील निमकर नाका परिसरातील गायत्री धाम सोसायाटी या ठिकाणी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी आणि जाहिरात फलकांमुळे काही सीसीटीव्ही कॅमेरे झाकले गेल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी संबंधित नवरात्रोत्सव मंडळाला सूचना देऊनही बॅनरमुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कामकाजात निर्माण झालेला अडथळा अद्याप दूर झालेला नसल्याचे दिसून येत आहे.
टिटवाळ्यात नवरात्रोत्सवानिमित्त विविध ठिकाणी आकर्षक स्वागत कमानी, बॅनर आणि जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. उत्सवाचा उत्साह आणि धार्मिक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने मंडळांकडून अशा सजावटी केल्या जातात. मात्र, ही सजावट करताना सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे. संबंधित ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी आणि त्यावरील बॅनरमुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दृश्य क्षेत्रात अडथळा निर्माण झाल्याचे छायाचित्रांवरून दिसून येते. त्यामुळे संबंधित परिसरातील हालचालींचे चित्रीकरण करताना अडचणी येण्याची शक्यता आहे.
गुन्ह्यांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे
शहरात चोरी, वाहनचोरी, मारहाण, अपघात किंवा अन्य गुन्हे घडल्यास संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. संशयित व्यक्तींची ओळख पटविणे, वाहनांची हालचाल तपासणे आणि घटनाक्रम समजून घेणे यासाठी या फुटेजचा उपयोग होतो. मात्र, ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमोरच बॅनर किंवा स्वागत कमानी आडव्या येतात, त्या ठिकाणचे दृश्य स्पष्टपणे टिपले जाण्याची शक्यता कमी होते. ऐन गरजेच्या वेळी संबंधित फुटेज उपलब्ध झाले नाही किंवा त्यातून आवश्यक माहिती मिळाली नाही, तर तपासाच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हा प्रश्न केवळ बॅनर लावण्यापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित आहे.
पोलिसांच्या सूचनेनंतरही परिस्थिती कायम
संबंधित ठिकाणी बॅनरमुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दृश्य क्षेत्रात अडथळा निर्माण होत असल्याची बाब पोलिसांकडून संबंधित नवरात्रोत्सव मंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याची माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळविताना अडचणी येऊ शकतात, याची जाणीव करून देऊनही कॅमेऱ्यांना अडथळा होणार नाही अशा पद्धतीने बॅनर लावण्याबाबत अद्याप आवश्यक बदल करण्यात आलेले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांच्या सूचनेनंतरही हा प्रश्न कायम असल्यास संबंधित यंत्रणा आणि मंडळ यांच्यातील समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
सण आणि उत्सव हे समाजातील एकोपा, श्रद्धा आणि आनंदाचे प्रतीक आहेत. नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यास कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, उत्सव साजरा करताना सार्वजनिक रस्ते, वाहतूक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि पोलिसांच्या कामकाजात अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणेही आवश्यक आहे. धार्मिक उत्सवाच्या सजावटीमुळे शहराच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या यंत्रणेची कार्यक्षमता बाधित होत असेल, तर त्या सजावटीचा फेरविचार करणे गरजेचे आहे.
नवरात्रोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे दृश्य क्षेत्र मोकळे राहील, अशा पद्धतीने बॅनर आणि स्वागत कमानींची रचना करावी. तसेच, संबंधित यंत्रणांनीही अशा अडथळ्यांची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उत्सवाचा आनंद आणि शहराची सुरक्षा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमोरील अडथळे तातडीने दूर केले जाणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.












Leave a Reply